कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करा आणि स्वतंत्र शिक्षक भरती करा; संजय कोकरे यांची जोरदार मागणी

मुंबई:-कोकण विभागातील शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे असताना कोकणातील पात्र व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे बंद असलेले कोकण निवड मंडळ तातडीने पुनरुज्जीवित करून त्यामार्फत कोकण विभागातील शिक्षकांची स्वतंत्र भरती करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली आहे.
कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करा आणि स्वतंत्र शिक्षक भरती करा; संजय कोकरे यांची जोरदार मागणी
kokan-niwad-mandal-teacher-recruitment

कोकण विभागातील शैक्षणिक परिस्थिती, जिल्हानिहाय गरजा, स्थानिक भाषा, भौगोलिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची संख्या यांचा स्वतंत्रपणे विचार करून शिक्षकांची पदे निश्चित करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच भरती प्रक्रिया राबविण्याऐवजी कोकण विभागासाठी स्वतंत्र शिक्षक भरती यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज आहे अशी भूमिका अभियानाने घेतली आहे. कोकणातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे तसेच मुंबई आणि मुंबई उपनगरातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपलब्धतेचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात यावा. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत, ती पदे तातडीने भरावीत.
कोकणातील विद्यार्थ्यांना शिक्षक हवेत आणि कोकणातील तरुणांना रोजगार हवा आहे. मग शिक्षक भरतीसाठी स्वतंत्र कोकण निवड मंडळ का नसावे? असा सवाल संजय कोकरे यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक तरुणांना प्राधान्याची मागणी
कोकणातील पात्र उमेदवारांना त्यांच्या विभागातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने कायदेशीर व घटनात्मक चौकटीत योग्य धोरण तयार करावे. शिक्षक भरतीमध्ये जिल्हानिहाय रिक्त पदे, स्थानिक शैक्षणिक गरजा आणि पात्र उमेदवारांची उपलब्धता यांचा समन्वय साधला जावा. शिक्षणाचा प्रश्न म्हणजे कोकणाच्या भवितव्याचा प्रश्न!
शिक्षकांची कमतरता ही केवळ सरकारी नोकरीची समस्या नाही; ती कोकणातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध झाले नाहीत, तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने केवळ भरतीच्या घोषणा न करता रिक्त पदांची वस्तुनिष्ठ माहिती जाहीर करून कालबद्ध पद्धतीने शिक्षक भरती पूर्ण करावी अशी मागणी स्वतंत्र कोकणराज्य अभियानाने केली आहे. शासनाला इशारा
बंद असलेले कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करा, कोकणातील शिक्षकांची रिक्त पदे भरा आणि कोकणातील पात्र तरुणांना रोजगाराची संधी द्या अशी मागणी अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही आणि संविधानिक मार्गाने जनजागृती व आंदोलन उभारण्याचा इशारा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाच्या वतीने देण्यात आला आहे. कोकणातील शिक्षणाचा आणि कोकणातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आता दुर्लक्षित करून चालणार नाही. कोकणासाठी स्वतंत्र नियोजन आणि स्वतंत्र भरती यंत्रणा आवश्यक आहे. असे मत स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक संजय कोकरे यांनी मांडले आहे.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: