दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन,नागरिकांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक – माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा

धाराशिव : सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. दुष्काळासारख्या संकटावर मात करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन,नागरिकांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक – माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा
Joint efforts by the government and citizens are essential to tackle drought – Hon. Governor Jishnu Dev Varma

शासन आणि नागरिक यांनी एकत्रित काम केल्यासच जलसंवर्धनामध्ये यश मिळू शकते, असे प्रतिपादन माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. पुढच्या वेळी जेव्हा या गावात येईन, तेव्हा बलसूर गावचा कायापालट झालेला दिसेल, असा विश्वासही राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केला.

आज १९ नोव्हेंबर रोजी उमरगा तालुक्यातील बलसूर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात राज्यपाल श्री.जिष्णू देव वर्मा बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रवीण स्वामी, माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‍जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, प्रा.सुरेश बिराजदार, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हा प्रशासन सध्या तात्कालिक आणि दीर्घकालीन अशा दोन स्तरांवर काम करत आहे. तत्कालिक उपाययोजनांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा,प्रत्येक घरात रोजगार पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. नागरिकांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे, पुढील मदतही दिली जाणार आहे. दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून मशीनच्या साहाय्याने नाले रुंद व खोल करण्याचे काम सुरू आहे. तसेच, जलसंवर्धनाच्या कामात ‘पाणी फाउंडेशन’चीही मदत घेतली जात आहे,असेही राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले.

ग्रामस्थ गोविंद देवणे यांनी कृषी सिंचन आणि बाळासाहेब मोरे यांनी जिल्ह्याला 21 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर ग्रामस्थांनी मांडलेले मुद्दे रास्त आहेत. त्याबाबत प्रशासनाशी नक्कीच चर्चा केली जाईल, असे आश्वासनही राज्यपाल यांनी ग्रामस्थांना दिले.

“दुष्काळ काही कायमस्वरूपी समस्या नाही, आपण ती नक्कीच सोडवू शकतो, यासाठी एकमेकांची सोबत असणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाला विधायक सूचना देऊन आणि सहकार्य करून आपण या संकटावर मात करूया,”असे आवाहनही राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

त्रिपुराचा अनुभव आणि जलसंवर्धनाचे महत्त्व

स्वतःच्या त्रिपुरा राज्याचा अनुभव सांगताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, “मी ज्या त्रिपुरा राज्यातून येतो, तिथेही डोंगराळ भाग असून पाण्याचे मोठे संकट असते. मी तिथे मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना लोकांना नेहमी पाणी वाचवण्याचे आवाहन करायचो.” यंदा पाऊस 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी पाऊस जास्त होता, तेव्हा आपण पाण्याची काळजी केली नाही आणि भरपूर खर्च केला. त्यामुळेच आता टंचाई जाणवत आहे. जलसंवर्धन केवळ बोलून होत नाही, तर प्रत्येक व्यक्तीने त्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे राज्यपाल ‍जिष्णू देव वर्मा म्हणाले.

या कार्यक्रमात आमदार प्रवीण स्वामी यांनी 1993 च्या भूकंपातील गावांमधील काही योजना परिपूर्ण करण्यात याव्यात, याबाबत विनंती केली. शिवाय आंध्रप्रदेश,तेलंगणा आणि महाराष्ट्रातून दरवर्षी किमान 10 लाख भाविक उमरगा मतदारसंघातून तुळजापूरला पायी जातात. महामार्गालगत चालताना होणाऱ्या अपघातांत वर्षाला किमान १० जणांचा मृत्यू होतो,असे अपघात टाळण्यासाठी महामार्गाला लागून 8 ते 12 फूट रुंदीचा पदपथ (पेडेस्ट्रियन पाथ) उभारण्याची योजना तयार करण्याबाबत सूचित करावे, असेही आमदार स्वामी यांनी सांगितले.

श्री. बिराजदार यांनीही उमरगा आणि लोहारा तालुक्यात दुष्काळामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत विविध मागण्या मांडल्या.

सुरुवातीला राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पूजार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमोर केले. यावेळी जिल्ह्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, चारा उपलब्धता, जलसंधारणाची कामे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती सादर केली.

गावातील पीक-पाणी, दुष्काळी उपाययोजनांची पाहणी

बलसूर गावातील शेती,पीक -पाणी परिस्थिती,दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची पाहणी करत येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.गावातील पीक व चारा लागवड,साठवण तलाव आदींची पाहणी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. आगमनानंतर त्यांनी उमरगा तालुक्यातील बलसूर याठिकाणी रमेश हिंगमिरे यांच्या शेतातील १.८२ हेक्टरवरील पेरूच्या बागेची पाहणी केली.तसेच शेतकरी माधव नामा कांबळे यांच्या शेतात ज्वारी पिकाची पाहणी केली.तसेच शेतकरी माधव कांबळे यांच्याशी पीक परिस्थितीबाबत माहिती जाणून घेत त्यांच्याशी त्यांच्या बांधावर संवाद साधला.तर बलसूर येथीलच माणिक साखरे यांच्या ३.४२ हेक्टरवरील ऊस पिकाचीही त्यांनी पाहणी केली.

नाला सरळीकरण कामाचे उद्घाटन

बलसुर ग्रामपंचायतीच्या सहभागातून तयार करण्यात येत असलेल्या राम वाकडे (लेंडकी) ते यासीन डांगे यांच्या शेतापर्यंत असलेल्या नाला सरळीकरण कामाचे उद्घाटन माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.सध्या कोरड्या असलेला बलसुर साठवण तलाव क्रमांक २ यास भेट देऊन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी तलाव परिस्थितीची पाहणी केली.या तलावाचा परिसरातील नागरिकांना लाभ होतो,सध्या गाळपेरा क्षेत्रात चारा लागवड करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.थोरात यांनी सांगितले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: