जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
शहादा(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद केंद्रशाळा, डोंगरगाव येथे 27 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
विद्यार्थ्यांनीही आपल्या बहिणींचे सदैव संरक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व, भाऊ- बहिणीचे नाते तसेच प्रेम, विश्वास आणि आपुलकी याबाबत मनोगते व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, परस्पर आदर, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक एकोपा यांसारख्या मूल्यांची जडणघडण होण्यास मदत झाली. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिकच आनंददायी ठरला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून नात्यांमधील प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
