सेवा संकल्प अभियान-2026 अंतर्गत लोकसहभागातुन शाळा विकास – स्व.श्रीम. सुरेखा संजय छाजेड यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त जिल्हा परिषद कन्या शाळेस शैक्षणिक व क्रीडा साहित्य वितरण!
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत स्व.श्रीम. सुरेखा संजय छाजेड यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त छाजेड परिवाराच्या वतीने विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, क्रीडा व सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. सेवाभाव पूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
स्व.श्रीम. सुरेखा छाजेड यांच्या स्मृती जपताना समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आदर्श संजय छाजेड परिवाराने यानिमित्ताने समाजासमोर ठेवला. शाळेस ग्रंथालयासाठी कपाट, विविध प्रकारचे क्रीडा साहित्य, लेझीम, डंबेल्स, बॅडमिंटन साहित्य, चेंडू, दोरीउडी, रिंग, तसेच विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन चित्रकला वह्या, सचित्र बालमित्र, चार रेघी व दोन रेघी वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यांत आले.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी वटवृक्ष व पिंपळ या वृक्षांचे वृक्षारोपण (संरक्षण जाळीसह ) करण्यात आले. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास श्री. संजय छाजेड, डॉ. विजय पटेल (डीआरडीओ शास्त्रज्ञ), अनिल छाजेड, संकेत छाजेड, महावीर छाजेड, के. डी. पाटील, आर. टी. पाटील, नरेंद्र पटेल, माधवभाई पाटील, गणेशभाई पाटील, मानकभाई चौधरी (अध्यक्ष, साने गुरुजी मित्र मंडळ, शहादा), अजितभाई साभद्रा, भरतभाई पाटील (अध्यक्ष, जायंट्स ग्रुप ऑफ शहादा), भूषण बाविस्कर, सतीश जव्हेरी, शरदभाई पाटील, विजय भावसार, श्रीमती सिद्धी छाजेड, श्रीमती आरती छाजेड, कु. ऐश्वर्या छाजेड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामचंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद नंदुरबार, नंदुभाई पाटील, सामाजिक कार्यकर्ता, सुनीलभाई पाटील उपस्थित होते. छाजेड परिवाराकडून शाळेतील स्वयंपाकीण सुमन सामुद्रे व बकुळा चव्हाण यांना भेट वस्तु देऊन त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला.
स्व. श्रीम. सुरेखा छाजेड यांच्या स्मृतीदिनानिमित्त करण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्मृती जपताना समाजासाठी काहीतरी देणे’ हा सकारात्मक संदेश अधोरेखित झाला. छाजेड कुटूंबाचा हा सेवाभाव विद्यार्थिनींच्या शिक्षणाला, क्रीडा कौशल्याला आणि सर्जनशीलतेला बळ देणारी असुन लोकसहभागातुन शाळेच्या विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
Follow Us:

