अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणावर मार्गदर्शन संपन्न!
ग्रामीण भागातील महिला, माता आणि बालकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे 'सेवा संकल्प' कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांना माता व बाल आरोग्य, नियमित आरोग्य तपासणी, वेळेवर लसीकरण, संतुलित पोषण आहार, कुपोषण प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य आजारांपासून बचाव आणि किशोरवयीन आरोग्य यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. याशिवाय शासनाच्या विविध आरोग्यदायी योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.
अंगणवाडी केंद्रामार्फत पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दैनंदिन जीवनात योग्य वापर कसा करावा, बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढीचे नियमित निरीक्षण कसे ठेवावे आणि दैनंदिन आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी, याबद्दल उपस्थित महिला व पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
Follow Us:

