शहाद्याच्या धवल येवलेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
देशभरातील 40 निवडक खेळाडूंमधून धवलची निवड झाल्याने शहादा शहरासह नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे 14 ते 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत एकूण 14 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना दक्षिण माजी आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय फलंदाज भारताचा ए.बी.डिव्हिलियर्स, माजी फिरकीपटू हरभजन सिंग, ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज
मॅथ्यू हेडन तसेच वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर क्लाइव्ह लॉईड यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन लाभणार आहे.
धवलच्या या उल्लेखनीय
यशाबद्दल शहादा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजीत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी धवलचे अभिनंदन करून त्याच्या आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. धवलच्या या यशामुळे त्याचे कुटुंबीय, विकास हायस्कूलचे शिक्षकवृंद, मित्रपरिवार आणि संपूर्ण शहादा शहरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धवलने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. आगामी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून धवलने देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

