आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ; आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनावर विशेष भर -पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे : आदिवासी समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदान आणि विकासाची नवी दिशा यांचा संगम घडविण्यासाठी धुळे जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ साजरा करण्यात येणार आहे.
आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ; आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनावर विशेष भर -पालकमंत्री जयकुमार रावल
Tribal Welfare Priority: Guardian Minister Jaykumar Rawal Pushes Government Schemes for Health, Education, Employment, and Self-Reliance

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या सप्ताहात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज दोंडायचा येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

पालकमंत्री रावल म्हणाले की, आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल-जमिनीचे रक्षण आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचे प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या सेवा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगून पालकमंत्री रावल म्हणाले की, विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 ११ व १२ नोव्हेंबर : जनजागृती आणि प्रसिद्धी

सप्ताहाची सुरुवात ११ व १२ नोव्हेंबर रोजी जनजागृती आणि प्रसिद्धी उपक्रमांनी होणार असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालयात तसेच आदिवासीबहुल तालुका मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन करून सप्ताहाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांना सप्ताहातील उपक्रमांची माहिती मिळून त्यामध्ये अधिकाधिक सहभाग घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 १३ नोव्हेंबर : कल्याणकारी योजनांचा लाभवाटप दिन

आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी १३ नोव्हेंबर रोजी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात येईल. तसेच नवीन अर्जांचे संकलन केले जाणार आहे.

याच दिवशी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA), प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) आणि महिला बचत गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कृषिपूरक व्यवसाय, सिंचन सुविधा आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत आदिवासी बांधवांना माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल. या उपक्रमातून आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१४ नोव्हेंबर : स्वच्छता, दीपोत्सव आणि संस्कृती दर्शन

आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक योगदान नव्या पिढीसमोर यावे, या उद्देशाने १४ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाचे व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी भव्य दीपोत्सव आयोजित केला जाणार आहे.

यासोबतच आदिवासी लोकसंस्कृती, देव-देवता आणि परंपरांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. या उपक्रमांमुळे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख व्यापक स्तरावर होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

१५ नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा जयंतीचा मुख्य सोहळा

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीदिनी १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा व तालुकास्तरावर भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. या दिवशी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस व स्थानिक आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’मध्ये गौरव झालेले आदिवासी समूह, समाजसेवक, बुद्धिजीवी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा जिल्हास्तरावर विशेष सत्कार करण्यात येईल. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.

तसेच चौक, रस्ते व उद्यानांना आदिवासी महापुरुषांची नावे देण्याचे प्रस्ताव हाती घेण्यात येणार आहेत. आदिवासी समाजाच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण पुढील पिढ्यांना कायम राहावे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१६ नोव्हेंबर : नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना विविध कार्यालयांत वारंवार जाण्याची गरज भासू नये, यासाठी १६ नोव्हेंबर रोजी नागरी सेवा व शासकीय कामकाज शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

नगरपालिकांच्या औद्योगिक व कामगार वस्त्यांमध्ये तसेच ग्रामपंचायतस्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येतील. या शिबिरांमध्ये वनपट्टेधारकांना लाभवाटप, कृषी योजनांची ऑनलाइन नोंदणी, पीकविमा आणि ई-सेवांबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. शासकीय सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

१७ नोव्हेंबर : आरोग्य व पोषण जनजागृती

आदिवासी बांधवांचे आरोग्य आणि पोषण ही विकासाची महत्त्वाची बाजू असल्याचे नमूद करून पालकमंत्री रावल म्हणाले की, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या सहकार्याने भव्य आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या शिबिरांमध्ये सिकलसेल (Sickle Cell) आजाराविषयी जनजागृती व तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह चाचणी, माता-बाल संगोपन तसेच स्थानिक पौष्टिक तृणधान्ये आणि आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासोबतच नागरिकांना आवश्यक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

१८ नोव्हेंबर : रोजगार, कौशल्य विकास आणि सप्ताहाचा समारोप

आदिवासी युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्यातील कौशल्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी १८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा, आयटीआय व कौशल्य विकास प्रशिक्षण, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, बँक खाते आणि डिजिटल आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील. या उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी युवकांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधींची माहिती मिळेल. याच दिवशी सप्ताहाचा समारोप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांनी सप्ताहात सक्रिय सहभागी व्हावे

जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा केवळ कार्यक्रमांचा उत्सव नसून आदिवासी बांधवांपर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा सन्मान राखत शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून त्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव, शेतकरी, युवक, महिला भगिनी आणि नागरिकांनी या सप्ताहातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि जनजातीय गौरव सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: