नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई: ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे तसेच महाराष्ट्रातील तरुण नवोन्मेषक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेली गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (जीटीयूआयसी) यांच्यात सामंजस्य करार झाला.
नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री मंगलप्रभात लोढा
State Government Committed to Promoting Innovation: Minister Mangal Prabhat Lodha

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित प्रभावी उपाय शोधण्यासाठी अधिकाधिक स्पर्धकांचा सहभाग वाढविणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थी व संभाव्य उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण विचारांना आणि स्टार्टअप्सना योग्य दिशा देण्याचे काम या कराराच्या माध्यमातून होईल. ग्रामीण व निमशहरी भागांतील गुणवान तरुणांना एकत्र आणून उद्योगजगताशी जोडणे आणि त्यांच्या कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, आयटीआय आणि पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची माहिती देण्यात येईल. निवडक नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवकांना केवळ रोजगार शोधणारे न ठेवता सक्षम उद्योजक म्हणून घडविण्याचा प्रयत्न केला जाईल. या सहकार्यामुळे राज्यातील शाश्वत विकास, नवोपक्रम आणि रोजगारनिर्मितीला गती मिळेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’च्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकतेला चालना देणार

– अध्यक्ष रवींद्र माणगावे

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेल्या गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले की, ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनविणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक, महिला आणि स्थानिक कारागिरांकडे व्यवसाय सुरू करण्याची क्षमता व कल्पना आहेत. मात्र, योग्य मार्गदर्शन, भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायवाढीला मर्यादा येतात. ही दरी भरून काढण्यासाठी संस्था गावपातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत कार्यरत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जिल्हास्तरीय उद्योगविषयक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीसाठी संस्था काम करीत आहे. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेसाठीही जास्तीत जास्त सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शिवाजी मानकर, शिखर जैन, रामेश्वर पवार, सुरेश घोरपडे, अण्णासाहेब पाटील, दिवाकर केसकर, ॲड. रिचा पाठक, अक्षता भांबळे, विशाल बंडगर आणि जितू चव्हाण यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: