महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर १ मे २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय कार्यक्रमाची रंगीत तालीम आज याच मैदानावर घेण्यात आली.
राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने ध्वजाला सलामी देण्यात आली.सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) आयोजित या कार्यक्रमात गृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताकदिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये
सशस्त्र दल, नि:शस्त्र दल आणि शालेय पथकास पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस पथक द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष पथक आणि तृतीय पारितोषिक संयुक्तपणे बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याचे सी-६० पथक यांनी पटकाविला.
निःशस्त्र दलांमध्ये प्रथम पुरस्कार मुंबई अग्निशमन दल, द्वितीय पुरस्कार सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा, तृतीय क्रमांक राज्य उत्पादन शुल्क यांनी पटकाविला.

