नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटीचा विशेष उपक्रम; ‘एआय’चा २० तासांचा प्रास्ताविक अभ्यासक्रम सुरू
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (NCERT) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) या विषयावर आधारित २० तासांचा विशेष प्रास्ताविक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
- निर्मिती व उद्देश: या अभ्यासक्रमाची रचना आयआयटी मद्रास आणि आयआयटी जोधपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यावहारिक आणि डिजिटलदृष्ट्या साक्षर करणे, हा याचा मुख्य हेतू आहे.
- अभ्यासक्रमाचे पाच टप्पे: २० तासांच्या या मॉड्यूलची प्रत्येकी चार तासांच्या पाच मुख्य टप्प्यांत विभागणी केली आहे. यामध्ये पायाभूत ओळख, संकल्पना स्पष्टीकरण, व्यावहारिक सराव, समस्या निवारण आणि मूल्यमापन व उजळणी यांचा समावेश आहे.
- काय शिकवले जाणार?: शिक्षण, आरोग्य, बँकिंग, उद्योग आणि मनोरंजन अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. या कोर्समधून विद्यार्थ्यांना एआय म्हणजे काय, त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे-तोटे, तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याची काळजी कशी घ्यावी, याचे धडे दिले जातील.
- डिजिटल उपकरणांशिवाय शिक्षण: विशेष म्हणजे, हा अभ्यासक्रम डिजिटल उपकरणांशिवाय (संगणक किंवा मोबाईल नसतानाही) सक्रिय शिक्षण, प्रात्यक्षिके आणि पारंपरिक साधनांच्या मदतीने वर्गात प्रभावीपणे शिकवता येणार आहे.
Follow Us:

