दुष्काळावर मात करू, शिवार शाश्वत समृद्ध करू! शेतकऱ्यांना मदतीसोबत जलसंधारण व सिंचनाला प्राधान्य -पालकमंत्री जयकुमार रावल

(धुळे) दुष्काळाने शिवारातील हिरवळ हिरावली असली, तरी शेतकऱ्यांच्या मनातील उद्याची आशा कायम आहे. यंदाची दिवाळी शेतकरी कुटुंबांसाठी आव्हानात्मक असली, तरी या संकटातून सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
दुष्काळावर मात करू, शिवार शाश्वत समृद्ध करू! शेतकऱ्यांना मदतीसोबत जलसंधारण व सिंचनाला प्राधान्य -पालकमंत्री जयकुमार रावल
drought-mitigation-water-conservation-top-priority-guardian-minister-jayakumar-rawal

बळीराजाच्या कष्टाला आधार देणे, त्याच्या हक्काची मदत वेळेत पोहोचवणे आणि पाण्याच्या शाश्वत व्यवस्थेतून शेतीला पुन्हा उभारी देणे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. दुष्काळाचे सावट दूर करून शिवार समृद्ध कृरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

शिंदखेडा तालुक्यातील आच्छी व दत्ताणे येथे आयोजित दिवाळी भेट व अन्नधान्य वितरण कार्यक्रमात पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, माजी सभापती जिजाबाराव पाटील, माजी सरपंच अण्णा इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य नारायणसिंग गिरासे, राहुल पाटील, विश्वनाथ पाटील, दिनेश पोद्दार, तहसीलदार नितीनकुमार देवरे, तालुका पुरवठा अधिकारी नितीन नंदावार, पुरवठा निरीक्षक धनराज पाटील यांच्यासह शेतकरी, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दिवाळीच्या निमित्ताने शेतकरी कुटुंबांच्या दिवाळी फराळाच्या आनंदात सहभागी होत त्यांनी शासनाच्या विविध मदत व विकास योजनांची माहिती दिली.

मदत वेळेत देण्यास प्राधान्य

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, यंदा पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सप्टेंबर महिन्यातच मदतीचा निर्णय घेतला. दुष्काळी परिस्थितीच्या पहिल्याच यादीत धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा समावेश करण्यात आला. दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी 5 हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यास सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांना मदत मिळण्याबरोबरच ती योग्य वेळी मिळणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सणाच्या काळात शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. पुढील टप्प्यातील मदतही पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

अन्नधान्य व साड्यांचे वाटप

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने आच्छी व दत्ताणे येथे अन्नधान्य आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील 14 हजार 314 अंत्योदय महिला लाभार्थ्यांना साड्यांच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काही महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात साड्यांचे वितरण करण्यात आले. तसेच पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात दिवाळीपूर्वी अन्नधान्याचे वाटप पूर्ण करण्यात आले असून, सुमारे 1 लाख 95 हजार लाभार्थ्यांपर्यंत ज्वारी, गहू, साखर, तांदूळ आदी अन्नधान्य दिवाळीपूर्वी पोहोचवण्यात आल्याचे सांगत पुणे मर्चंट चेंबरच्या सहकार्यानेही दिवाळी भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल पालकमंत्री श्री. रावल यांनी संस्थेचे आभार मानले. संकटाच्या काळात गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे ही सामाजिक बांधिलकी असून, अशा उपक्रमांमुळे समाजातील आपुलकी आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.

जलसंधारणाला विशेष प्राधान्य

दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले. तालुक्यातील नदी-नाले खोल व रुंद करणे, पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील. तापी नदीवरील प्रकाशा, सारंगखेडा आणि सुलवाडे प्रकल्पांसाठी केलेल्या पाठपुराव्याच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. बुराई नदी बारमाही करण्याचे काम, विविध सिंचन प्रकल्प आणि मतदारसंघातील सुमारे 10 हजार विहिरींच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.

 

पाइपलाइनद्वारे पाणी वितरण व्यवस्था (पीडीएन) आणि अन्य सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीला अधिक सक्षम पाण्याचा आधार देण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी 4 ते 6 महिन्यांतील पिण्याच्या पाण्याची गरज, उपलब्ध जलसाठा आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी स्पष्ट केले.

 

पात्र शेतकऱ्यांना मदतीची हमी

दुष्काळी मदतवाटपासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या यंत्रणांनी केलेल्या कामाचे पालकमंत्री श्री. रावल यांनी कौतुक केले. कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी रात्रंदिवस विशेष प्रयत्न करून शेतपिकांच्या नुकसानीचे 100 टक्के पंचनामे पूर्ण केले.

तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या संकेतस्थळावर बँक खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक, शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीसंबंधी आवश्यक कार्यवाहीचेही 100 टक्के काम पूर्ण करण्यात आले. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मदतवाटपाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ अद्याप न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतीमालाला योग्य बाजारभाव

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक असून, त्यासाठी सक्षम बाजारव्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले. भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) माध्यमातून राज्यात सुमारे 125 कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कापूस आणि मक्याला खुल्या बाजारात चांगला भाव मिळत असल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शेतीमालाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात जागतिक दर्जाची बाजार समिती उभारण्याचा संकल्पही पालकमंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.

विकासकामे व रोजगाराला गती

शिंदखेडा तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. रावल यांनी दोंडाईचा-शिंदखेडा, दोंडाईचा-सोनगीर रस्ते, शिंदखेडा ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर, पाणीपुरवठा योजना, प्रशासकीय इमारती, वसतिगृहे आणि गावांमधील रस्त्यांच्या कामांची माहिती दिली.

स्थानिक रस्त्याच्या कामासाठी सुमारे 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, 400 मीटर डांबरीकरण आणि 400 मीटर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या 3 महिन्यांत 156 शिक्षकांची नियुक्ती झाल्यामुळे मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर झाल्याची माहिती देताना पालकमंत्री श्री. रावल यांनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषधनिर्माणशास्त्र आणि शिक्षक शिक्षणाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या असून, नरडाणा औद्योगिक वसाहत तसेच सुमारे 2 हजार एकर क्षेत्रावरील औद्योगिक विकासाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते

आच्छी व दत्ताणे येथील कार्यक्रमात पालकमंत्री श्री. रावल यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पूर्वी तापी नदी ओलांडून गावोगावी केलेला प्रवास, नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झाल्याचे प्रसंग आणि गेल्या 2 दशकांत तालुक्यात झालेल्या विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला. तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक हे आपल्या मोठ्या परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत द्विगुणित करण्यासाठी येथे आलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याबरोबरच शेतीच्या शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांची जिद्द, शासनाची साथ आणि प्रशासनाच्या समन्वयातून या संकटावर मात करून शिवार समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री श्री. रावल यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मदतवाटपात शिंदखेडा प्रथम

प्रास्ताविक करताना तहसीलदार नितीनकुमार देवरे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील एकूण 3 लाख 65 हजार 11 शेतकऱ्यांपैकी सुमारे 2 लाख 59 हजार शेतकऱ्यांच्या मदतीला मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या मदतीला पुढील आठ दिवसांत मंजुरी मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील 83 हजार 216 खातेदारांपैकी 69 हजार 142 शेतकऱ्यांच्या मदतीला मंजुरी मिळाली असून, हे प्रमाण सुमारे 83 टक्के आहे. या कामगिरीत शिंदखेडा तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

तालुक्यातील 50 हजार 792 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी 5 हजार रुपयांची अग्रीम मदत जमा झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांतही पुढील आठ दिवसांत मदतीची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने सुरू असल्याचेही तहसीलदार श्री. देवरे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: