Home आरोग्य महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस :...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

0
Intention to provide treatment for brain disorders, osteoporosis, cancer under Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana: Public Health Minister Prakash Abitkar

पुणे: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार,अस्थिरोग आणि कर्करोगसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज केली.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३१ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्याचे अपारंपरिक ऊर्जा व दुग्धविकास, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, यावेळी उपस्थित होते.

भारती हॉस्पिटल येथील नूतनीकरण केलेल्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्यालय, अत्याधुनिक नेत्ररोग विभाग व नेत्रपेढी तसेच आय. व्ही. एफ. केंद्राचे उद्घाटन आणि विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री.आबिटकर म्हणाले, दर्जेदार शिक्षणातून गुणवत्ता जपत समाज घडविण्याचे कार्य भारती विद्यापीठामार्फत घडत आहे.

श्री.सावे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरचा विकास झपाट्याने होत असून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग व्यवसायात होणार आहे. अशा वेळी कुशल, अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेचीही मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. भारती विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरमध्ये शैक्षणिक तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री. सावे म्हणाले.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठाचे लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे भव्य शैक्षणिक संकुल उभे राहणार असून  पुण्यात भव्य क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे, असेही श्री. कदम म्हणाले.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, शिक्षणात तंत्रज्ञान हे सहाय्यक साधन आहे, पर्याय नाही. शिक्षणामध्ये मानवीमूल्य, नैतिकता आणि संवेदनशीलता टिकवून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

कुलगुरू डॉ. विवेक सावजी म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने २०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संस्थांशी आणि विद्यापीठांशी शैक्षणिक सहयोग करार केले आहेत. यावर्षी विश्वविद्यालयाला महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी २८ कोटी हून अधिक अनुदान नामवंत संस्थांकडून मिळाले आहे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तुरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.