
मुंबई : महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आज जागतिक लक्झरी उत्पादन बनली असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘मेड इन इंडिया’ची ताकद महाराष्ट्राने जगासमोर प्रभावीपणे सादर केली आहे.
भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा आणि लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. या करारानुसार कारागिरांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी प्राडा पुढील तीन वर्षांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी (केआयएलटी) येथे प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या पारंपरिक लेदर कारागिरांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या कारागिरीला आधुनिक डिझाइन आणि तांत्रिक कौशल्यांची जोड देण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात येणार आहे.
पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, प्राडा सोबत हा करार केवळ कारागिरांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा नाही, तर पिढ्यानढ्या जोपासलेल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे. एक जागतिक ब्रँड महाराष्ट्रातील कारागिरांसोबत काम करत असल्याने त्यांच्या या कौशल्याला एक ओळख मिळेल आणि कलेचे पूर्ण श्रेय या कारागिरांना मिळेल.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या भागीदारीची संकल्पना, समन्वय आणि अंमलबजावणी लिडकॉमने प्रभावीपणे केली असल्याचे नमूद केले.
विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कायदे, जागतिक संबंध आणि बौद्धिक संपत्ती हक्कांचा विचार करून अत्यंत सूक्ष्म नियोजनातून हा करार करण्यात आला आहे. कारागिरांच्या पिढीजात हक्कांचे संरक्षण हेच आमचे प्रमुख ध्येय होते.
लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, प्राडा सोबत हा करार भारतीय पारंपरिक हस्तकलेसाठी आणि अनेक दशकांपासून या कलेचे संरक्षण करणाऱ्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे.
प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३०० कोल्हापुरी कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. हे प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी येथे दिले जाईल. त्यापैकी सर्वोत्तम ३० कारागिरांना इटलीतील प्राडा अकादमीमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये डिझाइन, तांत्रिक कौशल्ये, डिजिटल साधने आणि बाजारपेठेतील ट्रेंड्स यांचा समावेश असणार आहे. यामुळे पारंपरिक कौशल्य जपत कारागिरांना आधुनिक बाजारपेठेसाठी सक्षम बनविण्याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे शतकानुशतके जपल्या गेलेल्या कोल्हापुरी चप्पल परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. यामध्ये लिडकॉम या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असून, गेल्या पाच दशकांपासून ही संस्था महाराष्ट्रातील चर्मकार आणि लेदर कारागिरांच्या सन्मान, उपजीविका आणि हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. १ मे १९७४ रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन झालेल्या लिडकॉमने पारंपरिक लेदर कारागिरीची ओळख जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोल्हापुरी चप्पलांना २००९ मध्ये भौगोलिक निर्देशांक (जीआय) दर्जा मिळवून देण्यात संस्थेचा मोठा वाटा आहे.
प्राडाच्या स्प्रिंग २०२६ मेन्सवेअर सादरीकरणानंतर या सहकार्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर प्राडाच्या प्रतिनिधीमंडळाने कोल्हापूरला भेट देत कारागिरांशी संवाद साधला. या चर्चेनंतर मुंबईतील इटलीच्या वाणिज्य दूतावासात लिडकॉम आणि प्राडा यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.















