‘देवरूखचे मिनी नायगारा’ ओझर धबधब्याचा होणार कायापालट, पर्यटन विकासाचा 7 कोटी 80 लाखांचा प्रस्ताव, क्रांती व्यापारी संघटनेची आमदार शेखर निकम यांच्याकडे पाठपुरावा

देवरूख:-सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, फेसाळणारा धबधबा आणि निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण करणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील पूर गावातील ओझर धबधब्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी क्रांती व्यापारी संघटना देवरूखने पुढाकार घेतला आहे.
‘देवरूखचे मिनी नायगारा’ ओझर धबधब्याचा होणार कायापालट, पर्यटन विकासाचा 7 कोटी 80 लाखांचा प्रस्ताव, क्रांती व्यापारी संघटनेची आमदार शेखर निकम यांच्याकडे पाठपुरावा
₹7.80 cr proposal to transform Devrukh's Ozar waterfall; Kranti Vyapari Sanghatana follows up with MLA Shekhar Nikam.

‘देवनगरी देवरूख पर्यटन प्रकल्पा’ अंतर्गत ओझर धबधबा आणि सप्तलिंगी नदी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तब्बल 7 कोटी 80 लाख रुपयांचा प्राथमिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव आमदार शेखर निकम यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. आमदार शेखर निकम यांनी यापूर्वी ओझर धबधबा परिसराला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याची पाहणी केली होती. या ठिकाणाचे सौंदर्य पाहून त्यांनी ओझरचा उल्लेख ‘देवरूखचे मिनी नायगारा’ असा केला होता. तसेच या ठिकाणी ग्लास ब्रिजसह पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ओझरच्या पर्यटन विकासाच्या अपेक्षांना नवी चालना मिळाली आहे. धबधबा पर्यटनापलीकडे ‘सिग्नेचर ग्लास स्कायवॉक’! या प्रस्तावाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ओझर धबधबा आणि सप्तलिंगी नदीचे विहंगम दर्शन घडविणारा आधुनिक ‘सिग्नेचर ग्लास स्कायवॉक’ होय. केवळ नदीवर पूल उभारण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात उंचावरून धबधबा आणि नदीचे सुरक्षित दर्शन घेता येईल, अशी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना मांडण्यात आली आहे. यामध्ये कँटिलिव्हर किंवा यू-आकाराचा ग्लास स्कायवॉक, काचेचे व्ह्यूइंग पॅनेल्स आणि 360 अंशांतून परिसराचे दर्शन घडविणारा व्ह्यूइंग डेक उभारण्याची संकल्पना आहे. प्रत्यक्ष रचना, लांबी आणि खर्च हे तांत्रिक सर्वेक्षण, भू-अभियांत्रिकी तपासणी आणि संरचनात्मक आराखड्यानंतर निश्चित केले जाणार आहेत.
या सुविधेमुळे पर्यटकांना धबधबा, सप्तलिंगी नदी, हिरव्यागार डोंगररांगा आणि परिसरातील धार्मिक स्थळांचे विहंगम दर्शन घेता येईल. ग्लास स्कायवॉकसाठी प्राथमिक स्तरावर 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. रिव्हर व्ह्यू गार्डनमुळे निसर्गसौंदर्यात पडणार भर ओझरच्या पर्यटन विकासात ग्लास स्कायवॉकइतकेच महत्त्व ‘रिव्हर व्ह्यू गार्डन अँड लँडस्केप डेव्हलपमेंट’ला देण्यात आले आहे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्याला साजेसे, पर्यावरणपूरक आणि कुटुंबांसाठी आकर्षक उद्यान विकसित करण्याची संकल्पना या आराखड्यात मांडण्यात आली आहे. या उद्यानात नदी आणि धबधब्याचे दर्शन घडविणारे पॅनोरॅमिक व्ह्यू डेक, निसर्गाच्या सान्निध्यातील पायवाटा, आकर्षक फोटो पॉइंट्स, सावलीतील बैठक व्यवस्था, विश्रांती क्षेत्र आणि स्थानिक वनस्पतींचे संवर्धन यांचा समावेश असेल. ‘Ozar – Mini Niagara Point’, ‘Saptalingi River View’ आणि ‘Devanagari Devrukh’ अशा आकर्षक फोटो पॉइंट्सच्या माध्यमातून या पर्यटनस्थळाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची योजना आहे. यासाठी 1 कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च प्रस्तावित आहे. म्युझिकल फाउंटन, आकर्षक रोषणाई आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा
पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी परिसरात संगीत कारंजे आणि नियंत्रित विद्युत रोषणाई विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. यासोबतच महिला, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पर्यटन माहिती केंद्र, सीसीटीव्ही, प्राथमिक उपचार सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि सौरऊर्जेच्या पर्यायांचाही आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या सर्व सुविधांमुळे ओझर धबधबा हे केवळ पावसाळ्यात भेट देण्याचे ठिकाण न राहता पर्यटकांना नियोजनबद्ध पद्धतीने निसर्गानुभव घेता येईल असे पर्यटन केंद्र बनू शकते.
7 कोटी 80 लाखांचा प्राथमिक खर्च आराखडा क्रांती व्यापारी संघटनेने प्रस्तावात विविध कामांसाठी पुढीलप्रमाणे प्राथमिक अंदाजित खर्च नमूद केला आहे ग्लास स्कायवॉक 2.50 कोटी, रिव्हर व्ह्यू गार्डन व लँडस्केप 1 कोटी, व्ह्यू पॉइंट, वॉकिंग ट्रॅक व सुरक्षा कठडे 45 लाख
आकर्षक विद्युत रोषणाई 55 लाख,
म्युझिकल फाउंटन व लाईट शो 65 ला. स्वच्छतागृहे 25 लाख, पिण्याचे पाणी व जलव्यवस्था 12 लाख, वाहनतळ व अंतर्गत रस्ते 40 लाख, पर्यटन माहिती केंद्र 20 लाख, सुरक्षा, सीसीटीव्ही व प्राथमिक उपचार 25 लाख, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन 16 लाख- प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक व सुशोभीकरण  22 लाख, विद्युत पायाभूत सुविधा व सौरव्यवस्था 20 लाख, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), सर्वेक्षण, तांत्रिक सल्ला व आकस्मिक तरतूद 65 लाख, एकूण प्राथमिक अंदाजित खर्च 7 कोटी 80 लाख. क्षहा खर्च प्राथमिक स्वरूपाचा असून प्रत्यक्ष जागेचे सर्वेक्षण, तांत्रिक तपासणी, आवश्यक परवानग्या आणि सविस्तर प्रकल्प अहवालानंतर अंतिम खर्च निश्चित होणार आहे. सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 मधून निधी मिळवण्याची मागणी, या प्रकल्पाला गती मिळावी आणि कोकणातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी आमदार शेखर निकम यांनी तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत स्थळाची पाहणी करून संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे प्रस्ताव सादर करावा. तसेच सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 अंतर्गत आवश्यक निधी मंजूर करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती क्रांती व्यापारी संघटनेने केली आहे.
पर्यटनातून स्थानिक रोजगारनिर्मितीचे स्वप्न ओझर धबधबा आणि सप्तलिंगी नदी परिसराचा नियोजनबद्ध विकास झाल्यास स्थानिक युवक, महिला बचत गट, शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्थानिक खाद्यपदार्थ, कोकणी उत्पादनांची विक्री, मार्गदर्शक सेवा आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना चालना मिळू शकते.त्याचबरोबर देवरूख, संगमेश्वर आणि आसपासच्या पर्यटनस्थळांना जोडून व्यापक पर्यटन साखळी विकसित करण्याची संधीही निर्माण होईल. मात्र, या विकासात नदीचे नैसर्गिक पात्र, जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही या प्रकल्प संकल्पनेत अधोरेखित करण्यात आले आहे. क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल सुनील कोळवणकर, उपाध्यक्ष इस्तियाक युनूस कापडी, सचिव नंदकिशोर मनोहर बेर्डे, कार्याध्यक्ष नितीन श्रीधर हेगशेट्ये, खजिनदार उदय यशवंत जागुष्टे आणि सहसचिव संदीप भार्गव वेल्हाळ यांच्यासह कार्यकारी मंडळातील पदाधिकारी सदस्य तसेच सर्व सभासद यांच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ‘ओझर सप्तलिंगी’ला आधुनिक पर्यटनाची नवी ओळख मिळाली, तर निसर्गसौंदर्या बरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही नवी उभारी मिळू शकते. ‘देवरूखचे मिनी नायगारा’ हे नाव प्रत्यक्ष पर्यटन विकासातून महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उमटणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: