जुनी पेन्शन हक्कासाठी २८ सप्टेंबरपासून मुंबईत धरणे आंदोलन; नंदुरबारमधील मेळाव्यात कर्मचाऱ्यांचा निर्धार!
या अनुषंगाने सेवानिवृत्ती वेतन प्राप्तीसाठी मेळावा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यासाठी प्रा. संपत शिवराम कदम (नाशिक) राज्य उपाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, तथा समन्वयक, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना समन्वयक संघ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर चर्चा विनिमय व पुढील आगामी काळातील धरणे आंदोलनाची दिशा नियोजन संदर्भात चर्चा विनिमय करण्यात आले. स्वागत सन्मानानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविकाद्वारे डी. डी.साळुंके, अध्यक्ष नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशता/टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नंदुरबार यांनी 28 सप्टेंबर 2026 पासून आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन व पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरेल याचे नियोजन सांगून कार्यशाळेचे प्रयोजन व उद्देश स्पष्ट केले. तसेच कार्याध्यक्ष, कुंदन पाटील, सचिव, एस. पी.पाटील आय.डी.गिरासे यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत विविध सकारात्मक तसेच साधक बाधक विषयांवर मनोगत व्यक्त केले.से. नि. प्राचार्य डॉ. एन. डी.नांद्रे यांनी आपल्या अनुभव संपन्न मार्गदर्शनातून उपस्थित सर्वच पेन्शन पीडित बांधवांना संघटित होऊन पोट तिडकीने लढा दिल्यास आपला हक्क आपणास निश्चित मिळेल.
या शब्दात मुंबई येथे आंदोलनासाठी हजर राहण्याचे कर्मचाऱ्यांना आव्हान केले. मेळाव्याचे मार्गदर्शक प्रा. संपत कदम यांनी लढा यशस्वी करण्यासाठी आपणांस कशा पद्धतीने एकत्र येऊन संघटना कोणतीही असू द्या. मात्र पेन्शन पदरी पाडून घेणं असं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं व सर्वांनी एकमताने शासनासमोर आपल्या हक्काची मागणी केल्यास सामूहिक प्रयत्नांना आपल्याला यश मिळेलच फक्त सर्वांची उपस्थिती व एकजूट हेच आपल्या पेन्शन मिळण्यासाठी आवश्यक आहे. तसेच शासनाला आपल्या एकीचे बळ लक्षात आले पाहिजे. तरच आपल्याला व परीवाराला उतार वयातील भाकरीची व्यवस्था होईल. तेव्हा आपल्यासमोर “एकच मिशन जुनी पेन्शन” अशा विचारानेच आपण येणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या परिवारासह 28 सप्टेंबर पासून आझाद मैदान, मुंबई येथे सहभागी होऊया व शासनाला जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात भाग पाडू या. अशा स्वरूपात मेळाव्याला आलेले नंदुरबार जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनींना आवाहन केले.

