दिवाळीच्या रोषणाईत विद्युत सुरक्षेकडे लक्ष द्या खबरदारीचे महावितरणकडून आवाहन

नंदुरबार : आनंदाचा व उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या रोषणाईत विद्युत सुरक्षेकडे लक्ष द्या खबरदारीचे महावितरणकडून आवाहन
mahadiscom diwali electrical safety appeal

दिवाळीनिमित्त घरोघरी विद्युत रोषणाई, आकर्षक विद्युत माळा आणि आकाशकंदिलांची सजावट करण्याची लगबग सुरू झाली आहे. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक घर, इमारती, गॅलरी आणि परिसरात विद्युत दिव्यांच्या माळा लावून रोषणाई करतात. ही सजावट करताना वापरण्यात येणाऱ्या विद्युत माळांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे.

गॅलरीतील लोखंडी जाळी, घरातील लोखंडी जिना किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून विद्युत माळा आणि आकाशकंदिलांच्या वायर सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात. सजावटीसाठी वापरण्यात येणारी वायर अखंडित आणि सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच विद्युत माळा लावताना ओलसर हातांनी प्लग किंवा स्विचला स्पर्श करू नये. सजावटीच्या उत्साहात विद्युत सुरक्षेचे नियम विसरू नयेत. योग्य दर्जाच्या विद्युत साहित्याचा वापर, सुरक्षित जोडणी आणि आवश्यक खबरदारी घेतल्यास संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

काय काळजी घ्यावी?

·         घरातील किंवा इमारतीतील अर्थिंग योग्य असल्याची खात्री करावी.

·         आकाशकंदील लावताना विद्युत तारांची विशेष काळजी घ्यावी.

·         तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वायरचा वापर करू नये.

·         वायरमध्ये बिघाड असल्यास दुरुस्ती करून घ्यावी.

·         तुटलेल्या किंवा चिकटपट्टी जोडलेल्या वायरचा वापर टाळावा.

·         विद्युत माळा आणि घरगुती उपकरणांच्या जवळ तेलाचे दिवे किंवा मेणबत्त्या लावू नयेत.

·         अनेकदा आकाशकंदील किंवा विद्युत माळा लावण्यासाठी थ्री–पिन प्लगचा वापर न करता वायर थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या सहाय्याने खोचली जाते. अशा पद्धतीमुळे प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते.

·         विद्युत जोडणीसाठी योग्य प्लग आणि सॉकेटचाच वापर करावा.

·         एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे जोडून अतिरिक्त भार टाकू नये.

विद्युत यंत्रणेजवळ फटाके फोडू नयेत

विद्युत वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक विद्युत यंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीज वाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत.

कुठे संपर्क कराल?

विद्युत यंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००–२१२–३४३५ किंवा १८००–२३३–३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: