एस. ए. मिशन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याचे धडे; सुजाण वापरासाठी जनजागृती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मनीष पाडवी आणि पर्यवेक्षिका सौ. प्रतीक्षा वळवी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे, निलेश शिंदे आणि सौ. सुवर्णा देवरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याची सविस्तर माहिती दिली. माहिती मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा, अर्जाचा नमुना, आवश्यक शुल्क, माहिती मिळण्याची निर्धारित मुदत तसेच माहिती नाकारली गेल्यास किंवा विलंब झाल्यास प्रथम व द्वितीय अपील कसे दाखल करावे, याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.
‘माहिती अधिकार हा केवळ शासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी नसून, सर्वसामान्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे,’ असा संदेश यावेळी मार्गदर्शकांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी यांनी नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडून माहिती मिळविण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना, धोरणात्मक निर्णय, विकासकामे, निधीचा विनियोग आणि प्रशासकीय प्रक्रियांबाबत नियमांनुसार माहिती मिळविता येते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरी हक्क, कर्तव्ये आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत सजगता निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी माहिती अधिकार कायद्याशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. मार्गदर्शकांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत कायद्याचा जबाबदारीने आणि योग्य कारणासाठी वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. सुनीता कुंवर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्यात जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणारे असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

