तळोद्यात बैलपोळ्याचा उत्साह; सजवलेल्या बैलांची पारंपरिक मिरवणूक

तळोदा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा पारंपरिक सण असलेला बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांच्या कष्टात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाची आकर्षक सजावट करून विधिवत पूजा केली.
तळोद्यात बैलपोळ्याचा उत्साह; सजवलेल्या बैलांची पारंपरिक मिरवणूक
talodyat-bailpolayacha-utsah-sajavlelya-bailanchi-paramparik-miravnuk

बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगीबेरंगी झुली, घंटा, हार तसेच विविध अलंकारांनी सजविले. सजलेल्या बैलांच्या दर्शनासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून त्यांना नैवेद्य दाखविण्यात आला.

सायंकाळच्या सुमारास विविध गावांमध्ये सजविलेल्या बैलांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बैलांच्या गळ्यातील घंटांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि शेतकरी बांधवांचा उत्साह यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

कुटुंबातील सदस्यांनीही या सणात उत्साहाने सहभाग घेतला. बैलांना सजवून त्यांची पूजा केल्यानंतर त्यांना औक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांना असलेले महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले.

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आजही ग्रामीण भागात जपली जात असून, आधुनिकतेच्या काळातही बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांच्या पशुधनातील जिव्हाळ्याचे नाते अनुभवायला मिळाले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250