केंद्र सरकारने देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफसिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषधे नियम,१९४५ मध्ये सुधारणा करून हा निर्णय लागू केला आहे.आरोग्य मंत्रालयाने २९ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अनुसूची ‘के’ मधील नोंद क्रमांक १३(७) मध्ये बदल करण्यात आला असून, त्यातून ‘सिरप’ हा शब्द वगळण्यात आला आहे. यापूर्वी एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये परवानाधारक औषधविक्रेता उपलब्ध नसल्यास काही अटींवर कफ सिरप विक्रीस सवलत होती. नव्या सुधारणेमुळे ही सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील सर्व गावांमध्ये कफ सिरपची विक्री आणि वितरण औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० तसेच संबंधित नियमांचे पालन करूनच करावे लागणार आहे. यासाठी परवानाधारक औषधविक्रेत्यामार्फतच औषधांची विक्री करणे बंधनकारक राहील.
कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच औषध उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांनी संबंधित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत.

