ग्रामस्तरावर सर्व विभागांनी समन्वयाने काम करून अभियान प्रभावीपणे राबवावे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचे आवाहन
(नंदुरबार) ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावरील सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले.
सेवा संकल्प अभियानातंर्गत ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून तसेच प्रधान सचिव निपुण विनायक, आयुक्त, आरोग्य सेवा संजय काटकर आणि शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावरील सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. विभागनिहाय व संस्थानिहाय निश्चित केलेल्या निर्देशांकांनुसार गुणांकन करताना आढळणाऱ्या त्रुटींचे सूक्ष्म नियोजन करून आवश्यक कार्यवाही करावी. शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विभागांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी अभियानांतर्गत दैनंदिन कामकाज अधिक प्रभावीपणे राबवून त्याची सांख्यिकीय नोंद व अहवाल नियमितपणे ठेवण्याचे आवाहन केले. कामकाजात काही अडचणी आल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून त्यांचे निराकरण करावे आणि अभियानाची अंमलबजावणी सातत्याने सुरू ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अक्षय राउतवाड व गोविंद मोरे यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी ग्रामस्तरावरील अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांनी शासन निर्णयातील विविध मुद्द्यांचे विश्लेषण करून मार्गदर्शन केले.
लोकसहभागातून आरोग्यसंपन्न गाव घडविण्याचा संकल्प
‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ या तत्त्वज्ञानावर आधारित ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील आरोग्यमान सुधारण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून सुरू केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात निरोगी, सक्षम, जागरूक व सशक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांचा लोकसहभाग महत्त्वाचा आहे. गावोगावी आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि अभियानाची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचविणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यशाळेस जिल्ह्यातील प्रातिनिधिक सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक व सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हास्तरीय आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची गावोगावी प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प करण्यात आला. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
Follow Us:

