नवरात्रीत ‘जागर आरोग्याचा’; तरुणांसाठी नऊ दिवसांचा ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रम
नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणामुळे तरुणांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन नवरात्रोत्सवात राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात राज्यातील विद्यापीठे व वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि वैद्यकीय तज्ज्ञ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.
संवादाचे विषय :
- बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य
- संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी
- व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती
- मानसिक आरोग्य
- मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीन टाइम
- व्यसनांपासून दूर राहणे
- निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती
आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून आजार टाळण्याबाबत तरुणांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच ही माहिती कुटुंब, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित प्रश्न तज्ज्ञांसमोर मोकळेपणाने मांडता येणार असून, बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक प्रश्नांवर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
Follow Us:

