विज्ञापित

विलवडे रेल्वे स्थानकासाठी प्रवाशांचा एल्गार; एक्स्प्रेस थांबे व सुविधांच्या मागणीसाठी ७० गावांचा एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभाग

लांजा : विलवडे रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई आणि ग्रामीण संघर्ष समितीच्या वतीने २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला परिसरातील ७० हून अधिक गावांतील प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विलवडे रेल्वे स्थानकासाठी प्रवाशांचा एल्गार; एक्स्प्रेस थांबे व सुविधांच्या मागणीसाठी ७० गावांचा एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभाग
vilwade-railway-station-passengers-protest-express-stops-facilities-70-villages

विलवडे स्थानकाच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रवासी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. प्रवाशांचा वाढता सहभाग आणि स्थानिक नागरिकांचा आक्रोश यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाचेही या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले.

विज्ञापित

एक्स्प्रेस थांबे नसल्याने प्रवाशांची गैरसोय

लांजा तालुक्याचा पूर्व भाग तसेच लांजा-राजापूर तालुक्यांच्या सीमावर्ती परिसरासाठी विलवडे रेल्वे स्थानक महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. लांजा आणि राजापूर तालुक्यांतील अनेक गावांसह अणुस्कुरा घाटमाथ्यावरील आणि वैभववाडी तालुक्यातील काही गावांतील नागरिक रेल्वे प्रवासासाठी या स्थानकावर अवलंबून आहेत.

मात्र, अपेक्षित प्रमाणात एक्स्प्रेस गाड्यांना विलवडे येथे थांबा नसल्याने प्रवाशांची अनेक वर्षांपासून गैरसोय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मुंबईसह अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनेकदा पुढील स्थानक गाठावे लागते. काही वेळा गर्दीच्या गाड्यांमधून प्रवास करावा लागतो, तर आरक्षण किंवा सोयीस्कर रेल्वे उपलब्ध न झाल्यास खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

स्थानकातील सुविधांचाही प्रश्न ऐरणीवर

एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यांसोबतच विलवडे स्थानकावरील मूलभूत सुविधांचा प्रश्नही आंदोलनातून उपस्थित करण्यात आला. स्थानकावर सध्या एकच फलाट असल्याने गाडीत चढताना-उतरताना प्रवाशांना अडचणी येतात. प्रतीक्षालयाचीही दुरवस्था झाली असून पिण्याचे पाणी, स्वच्छता, आसनव्यवस्था, निवारा आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून कामांचे आश्वासन

उपोषणाची दखल घेत कोकण रेल्वेचे आंबार्डेकर आणि अहिरे यांनी लांजा तहसीलदार श्रीमती ढोले यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाशी चर्चा केली.

यावेळी प्रतीक्षागृह फलाटाला जोडणे, त्याच बाजूला रॅम्प उभारणे, फलाटाशी समतल असलेला मार्ग व्यवस्थित करणे आणि तेथे दिव्यांची व्यवस्था करणे ही कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

तसेच रस्त्यावरील दिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे आणि ड्रेनेजच्या उघड्या टाकीला बंदिस्त करण्याचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या फलाटाच्या बांधकामासाठी प्रस्ताव तयार करून पुढील महिन्यात त्याबाबत माहिती देण्यात येईल, असेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पाच एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रस्ताव

विलवडे येथे जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोचुवेली आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची सत्यप्रतही शिष्टमंडळाला देण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर शिष्टमंडळाने तात्पुरते समाधान मानून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून हालचाल दिसली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.

प्रवाशांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

विलवडे स्थानकाच्या प्रश्नांकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याने आता प्रवाशांनी संघटितपणे आवाज उठविला आहे. एक्स्प्रेस गाड्यांना थांबे, स्थानकाचा विकास आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्र गीत विश्वनाथ आयरे यांनी सादर केले, तर विजय हटकर आणि काशिनाथ चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

या आंदोलनात संघटनेचे मुंबई अध्यक्ष यशवंत जडयार, कार्याध्यक्ष रमेश काटकर, ग्रामीण अध्यक्ष अमोल रेडीज, सल्लागार सुभाष लाड यांच्यासह जगदीश राजापकर, गुरुप्रसाद देसाई, विनय गांगण आणि विश्वनाथ गुरव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थ आणि रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: