मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीला गती

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पा’च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि पर्यावरण सल्लागार कंपन्यांच्या निवडीला महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाने मान्यता दिली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रकल्पाच्या नियोजनबद्ध आणि कालबद्ध अंमलबजावणीला गती मिळणार आहे.
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीला गती
mumbai-water-metro-project-first-phase-implementation-accelerated

पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला कार्यक्षम, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत हा प्रकल्प हाती घेतला आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेडने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार पहिल्या टप्प्यात ८ विद्यमान आणि ९ नवीन अशा एकूण १७ जलमार्गांवर २६ प्रवासी टर्मिनल विकसित अथवा श्रेणीसुधारित करण्यात येणार आहेत. आवश्यक नौवहनविषयक आणि आपत्कालीन पायाभूत सुविधाही उभारण्यात येणार आहेत.

या प्रकल्पामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसह लगतच्या परिसरातील प्रवाशांना आधुनिक जलवाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक आणि शाश्वत प्रवासी जलवाहतूक जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रकल्प व्यवस्थापन, रचना, खरेदी सहाय्य आणि पर्यवेक्षणासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत ‘मे. टिप्सा इंडिया प्रा. लि.’ आणि ‘रिना कन्सल्टिंग एसपीए’ या संयुक्त उपक्रमाची सर्वोच्च गुणांकित निविदाधारक म्हणून निवड केली आहे. हे सल्लागार सविस्तर अभियांत्रिकी व रचना, कामाचे आराखडे व निविदा कागदपत्रे तयार करणे, खरेदी प्रक्रियेस सहाय्य, बांधकाम पर्यवेक्षण, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रकल्प देखरेखीची जबाबदारी सांभाळणार आहे.

पर्यावरणीय नियमांचे पालन आणि आवश्यक वैधानिक मंजुरी वेळेत मिळविण्यासाठी मंडळाने ‘मे. बिल्डिंग एन्व्हायर्नमेंट इंडिया प्रा. लि.’ या कंपनीची सर्वोच्च गुणांकित पर्यावरण सल्लागार म्हणून निवड केली आहे. ही कंपनी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल, पर्यावरण व्यवस्थापन आराखडा, सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र व पर्यावरणीय मंजुरी, वन आणि पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंबंधी मंजुरी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य संबंधित प्राधिकरणांच्या परवानग्यांसाठी तांत्रिक सहाय्य करणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान पर्यावरणीय देखरेखीची जबाबदारीही या कंपनीकडे राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संचालक मंडळाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि पर्यावरण सल्लागार यांच्या निवडीस दिलेली ही मान्यता मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक, आधुनिक आणि शाश्वत प्रवासी जलवाहतूक जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचालीस प्रारंभ झाला आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: