‘आम्ही सर्व जण तुमच्या मदतीसाठीच आहोत’ मुलींना मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही

(नंदुरबार) तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल, तुमच्या शिक्षणात किंवा भविष्यात काही अडथळे येत असतील, तर काळजी करू नका.
‘आम्ही सर्व जण तुमच्या मदतीसाठीच आहोत’ मुलींना मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही
Aditi Tatkare assures girls of government support
          आम्ही सर्व जण तुमच्या मदतीसाठीच आहोत. तुमच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासन व प्रशासन सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रुखमाबाई बालिकाश्रमातील मुलींना दिली.
            जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी सोरापाडा, ता. अक्कलकुवा येथील रुखमाबाई बालिकाश्रमाच्या मुलींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवासाची, भोजनाची तसेच बालगृहातील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. मुलींच्या समस्या जाणून घेत त्यांना मनमोकळेपणाने आपले विचार मांडण्यास प्रोत्साहित केले.
बालगृहातील मुलींनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि भविष्यात विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत होऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले. मुलींनी स्वतःमधील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जावे. शिक्षण, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
          बालगृहांमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषक आहार, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष लक्ष देऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी मुलींच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सूचनांची दखल घेतली. बालगृहातील सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून मुलींच्या हितासाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
        दरम्यान, बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा येथील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आचल धीरज वसावे हिला जिल्हाधिकारी म्हणून कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. तिने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. विद्यार्थिनींमध्ये प्रशासकीय सेवेविषयी आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
         जिल्हाधिकारी डॉ. सेठी एक दिवसाच्या जिल्हाधिकारी या संकल्पनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुलींमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रशासनाची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. एक दिवसाची जिल्हाधिकारी आचल वसावे हिने सांगितले की, मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी व्हावयाचे आहे. त्याची तयारी मी करीत आहे.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आनंद जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित आदी उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: