जिल्ह्यात रब्बी हंगामात पिक प्रात्यक्षिके व बियाणे वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
(नंदुरबार) जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण, मिनी किट वितरण तसेच ऊस पिकातील फ्लेक्झी घटकांतर्गत सुपरकेन नर्सरी यासह विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित पद्धती आणि उच्च उत्पादनक्षम वाणांचा प्रसार करून अन्नधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे, तालुकानिहाय उत्पादकता उद्दिष्ट साध्य करणे तसेच पीक पद्धतीच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
पीक प्रात्यक्षिकांसाठी लाभार्थी निवड
पीक प्रात्यक्षिके 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहेत. ही प्रात्यक्षिके शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थेमार्फत राबविण्यात येतील. एका गटाचे प्रात्यक्षिक क्षेत्र 10 हेक्टर राहणार असून, एका शेतकऱ्यास किमान 0.40 हेक्टर ते कमाल 1 हेक्टरपर्यंत लाभ देण्यात येईल.शेतकरी गट कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीस लाभ देण्यात येईल. प्रति गाव 25 शेतकरी किंवा प्रति गाव, प्रति पीक जास्तीत जास्त दोन गट निवडण्यात येतील.
महाडीबीटी पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी किंवा संस्थांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येईल. लाभ घेणाऱ्या शेतकरी सभासदाचा ॲग्रीस्टॅक आयडी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवडीत महिला लाभार्थ्यांना उद्दिष्टाच्या 30 टक्के प्रमाणात प्राधान्य देण्यात येईल. तसेच दिव्यांग, तृतीयपंथी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांचीही निवड करण्यात येणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरण
प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी लागेल. हा घटक वैयक्तिक शेतकऱ्यांमार्फत राबविण्यात येईल. लाभार्थी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक आयडी असणे आवश्यक आहे. पात्र वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येईल.
अंमलबजावणी
पीक प्रात्यक्षिके 10 हेक्टर क्षेत्राच्या समूह प्रात्यक्षिकाच्या धर्तीवर घेण्यात येतील. प्रत्येक शेतकऱ्यास किमान 0.40 हेक्टर ते कमाल 1 हेक्टरपर्यंत लाभ देण्यात येईल. शेतकरी सभासदाचा ॲग्रीस्टॅक आयडी असावा. एका शेतकऱ्याचा दोन गटांमध्ये सदस्य म्हणून समावेश असल्यास केवळ एका गटामार्फतच लाभ देय राहील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://mahadbt2.maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळाचा वापर करावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी केले आहे.
विज्ञापित
Follow Us:

