पुण्यातील बजाज फिनसर्व्हचे नवे मुख्यालय शहराच्या विकासाला देणार नवी दिशा; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातील बजाज फिनसर्व्हचे नवे मुख्यालय शहराच्या विकासाला देणार नवी दिशा; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
Bajaj-Finserv-New-Headquarters-Pune-to-Boost-City-Development-Fadnavis

पुणे येथील बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्षा शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह बजाज समूहातील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करायची असून त्यामध्ये बजाज फिनसर्व्हचा आधुनिक परिसर महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुणे आणि मुंबई देशातील फिनटेक इकोसिस्टीमच्या राजधानी झाल्या आहेत. पहिल्या तिमाहीत मुंबईने बंगळुरुला मागे टाकले असून एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी 61 टक्के गुंतवणूक मुंबईत झाली आहे. फिनटेक स्टार्टअपमध्येही मोठी वाढ झाली असून 59 टक्के वाढ आणि 900 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. ही इकोसिस्टीम नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही नेण्याची गरज आहे. लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली दिसेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
बजाज समूहाचा शंभर वर्षांचा वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दूरदृष्टी यांचा सुंदर संगम बजाज फिनसर्व्हच्या नव्या कॅम्पसमध्ये पाहायला मिळणार असून, हा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250