Home कला-साहित्य गुरु तेग बहादुरजींच्या वारशाला उजाळा; महाराष्ट्रात अध्यासन स्थापन करण्याचे राज्यपालांचे आवाहन

गुरु तेग बहादुरजींच्या वारशाला उजाळा; महाराष्ट्रात अध्यासन स्थापन करण्याचे राज्यपालांचे आवाहन

0
Commemorating the legacy of Guru Tegh Bahadur Ji; Governor calls for establishing a dedicated chair in Maharashtra.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘श्री गुरु तेग बहादुरजी यांचा वारसा’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केले. श्री गुरु तेग बहादुरजींच्या ३५० व्या शहादत दिनाचे औचित्य साधून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी, नवी दिल्ली आणि पंजाबी कल्चरल ॲण्ड वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई यांनी याचे आयोजन केले होते. अन्य धर्माच्या अनुयायांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादुरजी यांचे जीवन आणि विचार हे केवळ ऐतिहासिक स्मरण नसून आधुनिक लोकशाही, सामाजिक सौहार्द आणि धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमधील शतकानुशतकांचे गौरवास्पद समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते आहे. समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी ही ‘जुळी राज्ये’ आहेत. श्री गुरु तेग बहादुरजी यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान भारताच्या नागरी आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत अद्वितीय आणि प्रेरणादायी अध्याय आहे. गुरुंनी केवळ स्वतःच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर प्रत्येक मानवाला भीतीशिवाय आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे या सार्वभौम मूल्यासाठी ‘हिंद दी चादर’ बनून प्राणाहुती दिली. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये शतकांआधीच गुरुजींनी आपल्या जीवनकार्यातून प्रत्यक्ष जगून दाखवली. महाराष्ट्रातील ६५ सार्वजनिक व खाजगी विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात ‘श्री गुरु तेग बहादूर अध्यासन’ (Chair) स्थापित करावे. हे अध्यासन आंतरधर्मीय संवाद, संशोधन, अध्यापन आणि गुरुजींच्या विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याच्या संदेशाचा प्रचार-प्रसार करणारे कायमस्वरूपी केंद्र ठरेल – राज्यपाल

यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनावरे, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा, हरियाणा साहित्य आणि सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष कुलदीप चंद्र अग्निहोत्री, साहित्य अकादमीचे सचिव वरुण गुलाटी, प्रशासक तख्तश्री अबचल नगर, हुजूर साहिब विजय सतबीर सिंह, राज्यपालांचे संयुक्त सचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.