Home क्रीडा ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे दर्जेदार आयोजन करा – उपमुख्यमंत्री...

ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे दर्जेदार आयोजन करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

0
Ensure the high-quality organization of the Olympian Late Khashaba Jadhav State-Level Wrestling Competition – Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar.

बीड : क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू हे दिवंगत अजितदादा पवार यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या याच विकासदृष्टीचा वारसा पुढे नेत बीड जिल्ह्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटींच्या विकास आराखड्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या कामांना गती देण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील व्यायामशाळांना डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समिती तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, दिवंगत अजितदादा पवार यांनी बीड दौऱ्यादरम्यान जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन खेळाडूंशी प्रत्यक्ष संवाद साधला होता. त्यांच्या मागण्या जाणून घेत जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २५ कोटींच्या आराखड्यास मान्यता दिली होती. त्या निर्णयाला आता मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून दर्जेदार क्रीडा सुविधा उभाराव्यात.

त्या पुढे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा वारसा अधिक बळकट करण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी आणि सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. क्रीडा विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीत जिल्ह्यातील व्यायामशाळांना डीपीडीसीमधून आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. प्राप्त प्रस्तावांची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने छाननी करून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान बीड जिल्ह्याला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, ही स्पर्धा राज्याच्या प्रतिष्ठेला साजेशी, शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने आयोजित करण्यात यावी. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा, वाहतूक आणि सरावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच क्रीडारसिकांसाठीही योग्य नियोजन करण्यात यावे.
स्पर्धेच्या आयोजनात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.