शेतकऱ्यांनी आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे
(नंदुरबार) प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२६-२७ च्या ‘आंबिया बहार’ हंगामासाठी राबविण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील केळी, पपई आणि आंबा या अधिसूचित फळपिकांची लागवड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सध्याच्या बदलत्या हवामानामुळे कमी पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, जास्त तापमान व आर्द्रता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा व उत्पादनातील जोखीम कमी व्हावी, यासाठी ही योजना उपयुक्त आहे. या योजनेतंर्गत हवामान निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते.
योजनेत सहभागी होण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मध्ये पिकांची नोंद, अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार संलग्न बँक खाते. उत्पादनक्षम फळबाग असणे आणि बागेचे Geo Tagging करणे बंधनकारक आहे.
नंदुरबार जिल्ह्याकरिता ही योजना ‘इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे’मार्फत राबविण्यात येत असून, केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार ००० प्रति हेक्टर असून एकूण विमा हप्ता ३० हजार ६०० असून शेतकरी हिस्सा ८ हजार ५०० आहे. केळी पिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. पपई फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार प्रति हेक्टर असून एकूण विमा हप्ता ६ हजार असून शेतकरी हिस्सा २ हजार आहे. या पिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ अशी आहे.
तसेच आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार प्रति हेक्टर असून एकूण विमा हप्ता ८ हजार ५०० असून शेतकरी हिस्सा ८ हजार ५०० असा आहे. या पिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर, २०२६ अशी आहे.
शेतकऱ्यांनी आपले विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे अंतिम मुदतीपूर्वी सादर करावेत. संबंधित फळपिकानुसार जोखीमस्तर वेगवेगळे असल्यामुळे अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच बदलत्या हवामानामुळे उद्भवणऱ्या जोखमीपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक पात्र फळबागधारकाने आंबिया बहार फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी यांनी केले आहे.
Follow Us:

