दिवाळीत साकारावा गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा;‘दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
(नंदुरबार) महाराष्ट्राची समृद्ध ऐतिहासिक परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि गड-दुर्गांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात ‘दुर्गोत्सव 2026’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घराच्या अंगणात, गृहसंकुलात, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात किंवा उपलब्ध सुरक्षित जागेत गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
बदलत्या काळात अनेक पारंपरिक प्रथा-परंपरा लोप पावत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करण्याची सांस्कृतिक परंपरा जतन करणे, नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि शौर्यपरंपरेची ओळख करून देणे, तसेच दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सन 2025 मध्ये ‘Maratha Military Landscapes of India’ या नावाने महाराष्ट्रातील 12 दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाच्या 3 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या उपक्रमाला मान्यता देण्यात आली आहे.
ऑनलाइन नोंदणी व सहभागाची प्रक्रिया
‘दुर्गोत्सव 2026’ साठी 5 नोव्हेंबर 2026 ते 25 नोव्हेंबर 2027 या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सहभागी नागरिकांनी स्वतः दुर्गाची प्रतिकृती तयार करून त्यासोबत सेल्फी किंवा छायाचित्र काढावे आणि अमृत संस्थेच्या https://www.amrutdurgotsav.com/ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी अर्ज भरून छायाचित्र अपलोड करावे.नोंदणी व छायाचित्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीला डिजिटल स्वरूपातील ‘अभिनंदन पत्र’ उपलब्ध करून देण्यात येईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे पत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीची डाउनलोड लिंक किंवा सूचना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठविण्यात येईल.
पर्यावरणपूरक साहित्याच्या वापरास प्राधान्य
दुर्गाची प्रतिकृती तयार करताना पर्यावरणपूरक व सुरक्षित साहित्याचा वापर करावा. प्रतिकृती तयार करताना सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग किंवा अग्निसुरक्षा मार्गांवर अडथळा निर्माण होणार नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालये, कुटुंबे, गृहसंकुले, संस्था आणि विविध गटांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
छायाचित्र व नोंदणीसाठी महत्त्वाच्या अटी
दुर्गाची प्रतिकृती स्वतः तयार केलेली असणे आवश्यक आहे. इंटरनेट किंवा सोशल मीडियावरून घेतलेले छायाचित्र अपलोड करून सहभाग नोंदविता येणार नाही. छायाचित्रामध्ये सहभागी व्यक्ती आणि दुर्गाची प्रतिकृती स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. एकाच छायाचित्राचा पुनर्वापर, चुकीची माहिती किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोंदणी अमान्य केली जाऊ शकते. या उपक्रमातील सहभाग ऐच्छिक असून, सहभागासाठी कोणताही रोख किंवा आर्थिक लाभ अथवा पारितोषिक दिले जाणार नाही. डिजिटल अभिनंदन पत्र हे सहभागाची व छायाचित्राच्या पडताळणीची नोंद म्हणून देण्यात येणार आहे.
दुर्गोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आवश्यकतेनुसार नियम, कालावधी किंवा कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा अधिकार अमृत संस्थेस राहील. अशा बदलांची माहिती अधिकृत डिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीमध्ये दुर्गांविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी नागरिकांनी ‘दुर्गोत्सव 2026’ मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. असे आवाहन महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत करण्यात येत आहे.
Follow Us:

