मंडणगडच्या पाणीप्रश्नावर ऐतिहासिक निर्णय; ४१ कोटी ६९ लाखांच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन

रत्नागिरी: मंडणगड शहरवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीटंचाई आता इतिहासजमा होणार असून शहराच्या विकासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत मंजूर झालेल्या तब्बल ४१ कोटी ६९ लाख रुपये खर्चाच्या भव्य नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आज झाले.
मंडणगडच्या पाणीप्रश्नावर ऐतिहासिक निर्णय; ४१ कोटी ६९ लाखांच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन
Historic Decision on Mandangad's Water Crisis: Groundbreaking Ceremony Held for ₹41.69 Crore Tap Water Scheme

भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री कदम यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत आणि कालमर्यादेबाबत अत्यंत ठाम भूमिका मांडली. मंडणगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहरात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव होता. जलशुद्धीकरण केंद्र व टाकीसाठी आवश्यक असणारी आरोग्य विभागाची जागा मिळण्याबाबतचा चार वर्षांचा तिढाही अवघ्या काही दिवसांत सोडवण्यात आला. कंत्राटदारांनी हे काम मार्च २०२७ पर्यंत दिलेल्या मुदतीतच गुणवत्तापूर्वक करावे.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. ते म्हणाले, एखाद्या लोकप्रतिनिधीने मंत्री झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचा कायापालट कसा करावा, याचा वस्तुपाठ दापोली मतदारसंघात पाहायला मिळतो. योगेश कदम हे २४ तास जनतेच्या सेवेत कार्यरत असून थेट कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचून काम करणारे ते राज्यातील आघाडीचे नेते ठरले आहेत. शहरात सुरू असलेल्या या चौफेर विकासकामांमुळे आगामी काळात नगरपंचायतीवर विकासाचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा आणि ३० वर्षांचे नियोजन

सध्या शहरात जुन्या वाहिन्यांमधील गळतीमुळे दर चार ते पाच दिवसांआड केवळ अर्ध्या भागाला पाणीपुरवठा होत होता. या नव्या योजनेमुळे संपूर्ण चित्रात आमूलाग्र बदल होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ५० टक्के (२०.८५ कोटी), राज्य सरकारचा ४५ टक्के (१८.७६ कोटी) आणि नगरपंचायतीचा ५ टक्के (२.०८ कोटी) असा एकत्रित निधी खर्च केला जात आहे. योजनेअंतर्गत भारजा नदीवर जॅकवेल उभारून २.५० एमएलडी क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाईल. तेथून नागरिकांना दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर शुद्ध पाणी पुरवले जाणार आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी ३.२४ लाख लिटरची मुख्य संतुलन टाकी उभारण्यासह शिवाजी नगर, दुर्ग वाडी, गांधी नगर आणि कोंझर या भागात नव्या टाक्या बांधल्या जातील. शहरात ३५.२८ किलोमीटर लांबीचे वितरण जाळे अंथरून २,८४० घरगुती व ३१६ व्यावसायिक नळजोडण्या दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, भविष्यातील विजेची बचत व्हावी, यासाठी १५० किलोवॅट क्षमतेचा पर्यावरणपूरक सौर ऊर्जा प्रकल्प (सोलर प्लांट) बसवण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे वर्ष २०५६ पर्यंत म्हणजेच पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, शशिकांत चव्हाण, प्रताप घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, उपसभापती दीपक मालुसरे, दापोली नगराध्यक्ष कृपा घाग, माजी नगराध्यक्ष राजू पेटकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि मंडणगडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: