विज्ञापित

कात्री शाळेतील मद्यधुंद शिक्षकावर कारवाईची मागणी; ७ दिवसांत निलंबन न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मौजे कात्री (सोलखडीपाडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकावर कर्तव्याच्या वेळेत मद्यधुंद अवस्थेत उपस्थित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शिक्षकावर तातडीने निलंबन व बदलीची कारवाई करावी, अशी मागणी युवा क्रांती सामाजिक संघटना आणि युवा क्रांती ग्राम समितीने केली आहे. येत्या सात दिवसांत कारवाई न झाल्यास शाळेला टाळे ठोकून पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कात्री शाळेतील मद्यधुंद शिक्षकावर कारवाईची मागणी; ७ दिवसांत निलंबन न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
katri-school-drunk-teacher-action-demand-7-day-suspension-hunger-strike-warning

    यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धडगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात प्राथमिक शिक्षक भरतसिंग पावरा हे शाळेच्या वेळेचे पालन न करणे, कर्तव्यावर गैरहजर राहणे तसेच मद्यधुंद अवस्थेत शाळेत उपस्थित राहणे, असे प्रकार वारंवार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विज्ञापित

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे सांगत ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी संबंधित शिक्षकाला समज देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, त्यावेळी शिक्षकाने अरेरावीची भाषा वापरून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मोबाईल फोडल्याचा आरोप

     सुमारे दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ शाळेत गेले असताना संबंधित शिक्षकाने एका नागरिकाच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला आणि मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेचे व्हिडिओ व छायाचित्रे प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षकाच्या वर्तनामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पर्यायी शिक्षक नियुक्त करण्याची मागणी

    संबंधित शिक्षकाला महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, 1964 मधील तरतुदींनुसार निलंबित करून विभागीय चौकशी करावी, तसेच त्यांना कात्री शाळेतून तातडीने कार्यमुक्त करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सक्षम पर्यायी शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

    तसेच विस्तार अधिकाऱ्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पालक व ग्रामस्थांचे जबाब नोंदवावेत आणि निष्पक्ष चौकशी अहवाल सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. मोबाईलचे नुकसान आणि कथित धमक्यांप्रकरणी कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

    सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास कात्री शाळेला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही संघटनेने म्हटले आहे.

    निवेदन देताना युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाडवी, तालुका सचिव सुरेश वळवी, तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम समिती अध्यक्ष प्रविण वळवी, ग्राम समिती उपाध्यक्ष धीरसिंग वळवी, ग्राम समिती सचिव कांतीलाल वळवी, ग्राम समिती समन्वयक नरेंद्र वळवी यांच्यासह एकनाथ वळवी, गोविंद वळवी आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: