विज्ञापित

शाश्वत स्वच्छतेसाठी स्वयंशिस्त आवश्यक; अप्पर मुख्य सचिव पराग जैन यांचा ग्रामस्थांना संदेश

नंदुरबार : स्वच्छता ही केवळ एखाद्या अभियानापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मूलभूत सवयींमध्ये शाश्वतता आणणे गरजेचे असून, यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने स्वयंशिस्त अंगीकारावी, असे आवाहन राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव पराग जैन यांनी केले.
शाश्वत स्वच्छतेसाठी स्वयंशिस्त आवश्यक; अप्पर मुख्य सचिव पराग जैन यांचा ग्रामस्थांना संदेश
sustainable-cleanliness-requires-self-discipline-parag-jain-message-to-villagers

सेवा संकल्प अभियानांतर्गत शहादा तालुक्यातील रामपूर येथे आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वच्छता, आरोग्य आणि शाश्वत विकास यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला.

विज्ञापित

पराग जैन म्हणाले की, आरोग्य आणि स्वच्छता यांचा थेट संबंध आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे विकसित भारताचे भविष्यातील स्तंभ आहेत. देशातील मनुष्यबळ विविध क्षेत्रांत सक्षम असून, प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात शिस्त आणि जबाबदारीने काम केल्यास विकसित राष्ट्राचे उद्दिष्ट गाठणे अधिक सुलभ होईल.

सेवा संकल्प अभियान किंवा स्वच्छता अभियान केवळ ठराविक कालावधीपुरते न राहता त्यातून ग्रामस्थांच्या वर्तनात कायमस्वरूपी बदल घडला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गावातील सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी स्वच्छता व पाणी व्यवस्थापनासाठी शंभर टक्के योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छ भारत, जल जीवन मिशनच्या कामांची पाहणी

नंदुरबार जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी पराग जैन जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी शहादा तालुक्यातील रामपूर, दरा तसेच अक्राणी तालुक्यातील घाटली आणि काकरदा या गावांना भेटी देऊन विविध योजनांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, स्वच्छ भारत मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक गणेश मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील, शहाद्याचे गटविकास अधिकारी महेश पोतदार, सहाय्यक गटविकास अधिकारी विकास राठोड, अक्राणीच्या गटविकास अधिकारी पूजा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी संगीता नाईक यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना कंपोस्ट खड्ड्याचे प्रात्यक्षिक

रामपूर येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छ पाठशाला, विद्यार्थ्यांचा सहभाग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पराग जैन, नमन गोयल आणि शेखर रौंदळ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना कंपोस्ट खड्डा कसा भरावा, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध स्वच्छता उपक्रमांची माहिती दिली. गावांमध्ये स्वच्छता राखण्यासोबतच तिची शाश्वतता कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांचा नियमित वापर करून त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यावरही त्यांनी भर दिला.

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षारोपण

‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत रामपूर, दरा आणि घाटली येथे वृक्षारोपण करण्यात आले. रामपूर येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात येत असलेल्या कचरा विलगीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली.

दरा येथे जल जीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत उभारण्यात आलेल्या शालेय शौचालयाचीही पाहणी करण्यात आली.

घाटली येथे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर जल जीवन मिशनअंतर्गत सौरऊर्जेवर चालणाऱ्या दुहेरी नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यात आली. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. गावात स्वच्छतेचे सातत्य कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास रामपूरच्या सरपंच भारतीय रितेशकुमार वाघ, उपसरपंच नर्मदा पावरा, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा माळी, विरपूरच्या सरपंच वसंतीबाई राहासे, उपसरपंच धर्मसिंग पवार, ग्रामपंचायत अधिकारी सुधीर वाघ, घाटलीचे सरपंच दीत्या वळवी, ग्रामपंचायत अधिकारी भरत निकुंभे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: