राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
या अभियानांतर्गत राजापूर तहसील कार्यालयात सोमवार 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचा तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणार असून, दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार राजापूर तहसील कार्यालयाकडे प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने तडजोडीद्वारे निकाली काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमात जमिनीचे हिस्से व हक्क, जमिनीच्या वाटपाचे दावे तसेच वहिवाटीच्या रस्त्यांशी संबंधित वाद तडजोडीने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महसुली वादांवर परस्पर सहमतीने तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ज्या कार्यालयात महसुली दावा किंवा अपील प्रलंबित आहे, त्या ठिकाणी संबंधित दोन्ही पक्षकारांनी स्वतः अथवा आपल्या वकिलामार्फत शासन निर्णयातील ‘प्रपत्र-अ’नुसार तडजोडीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर संबंधित पक्षकारांची संमती निश्चित केली जाईल. त्यानंतर नियमानुसार तडजोडनामा तयार करून लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षकारांच्या संमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येतील. या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघण्यास मदत होणार असून, नागरिकांचा वेळ, खर्च आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या फेऱ्या कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच महसूल प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
संबंधित पक्षकारांनी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता राजापूर तहसील कार्यालयात उपस्थित राहून या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

