शेतातील काळ्या मातीला समृद्ध करणाऱ्या ‘तिच्या’ कष्टाला मिळणार अधिकृत ओळख; ‘महिला शेतकरी पोर्टल’चा शानदार शुभारंभ!
शेतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त घाम गाळून शेती फुलवणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला अखेर कायद्याचे कोंदण मिळाले आहे. 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६' अंतर्गत राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी एका अत्यंत महत्त्वाकांक्षी‘महिला शेतकरी पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भरणेवाडी येथून उत्साहात करण्यात आले. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतःची एक अधिकृत ओळख आणि हक्काचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
जमिनीची मालकी नव्हे, ‘तिचा’ शेतातील घाम महत्त्वाचा!
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता जमिनीची मालकी असण्याची अट नाही. “शेतीतील प्रत्यक्ष सहभाग आणि कष्ट” हाच एकमेव निकष लावण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक शेती, बागायती, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय यांसह अगदी शेतात राबणाऱ्या भूमिहीन शेतमजूर महिला, बटाईने शेती करणाऱ्या भगिनी आणि रोपमळा मजुरांनाही आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत मान्यता मिळणार आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही पात्र महिला कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतील.
१५ दिवसांत मिळणार हक्काचे प्रमाणपत्र; योजनांचे दरवाजे उघडणार!
ऑनलाईन अर्जानंतर स्थानिक ग्रामसभा किंवा नगरपंचायतीच्या मंजुरीने अवघ्या १५ दिवसांच्या आत पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून महिलांना हे प्रमाणपत्र घरपोच दिले जाईल. या एका प्रमाणपत्राच्या आधारे महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी कर्ज, पीक विमा, सवलतीच्या दरात बियाणे-खते आणि कृषी विस्तार सेवांचा लाभ थेट आणि अत्यंत सुलभतेने घेता येणार आहे.
कृषी विभागाच्या सेवासंकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या विशेष मोहिमेदरम्यान संपूर्ण राज्यात याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती, अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाणार असल्याची माहिती यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह आणि आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
विज्ञापित
Follow Us:

