मुंबई शहर, उपनगरातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत एनएसपी पोर्टलवर भरावेत

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (एनएसपी) सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, उपनगर विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबई शहर, उपनगरातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत एनएसपी पोर्टलवर भरावेत
mumbai-post-matric-scholarship-nsp-portal-last-date-30-november

प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज केवळ नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरच सादर करावेत. या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांनी नवीन अर्ज व नूतनीकरण अर्ज यांतील फरक लक्षात घेऊन योग्य पोर्टलवर अर्ज सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या पात्र इतर मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या चार योजनांचे नवीन अर्ज सादर करावेत. विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेच्या नियमानुसार पात्रता व उत्पन्नाच्या अटी तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहित मुदतीत पूर्ण करावेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये त्याच महाविद्यालयात द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ वर्षात शिक्षण सुरू ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी नूतनीकरण अर्ज पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत. नूतनीकरणासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलचा वापर करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता योजना, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, संबंधित प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या प्रशिक्षण शुल्क परतावा योजनांचे अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवरच सादर करावेत.

त्रुटी असलेल्या अर्जांची पडताळणी आणि संस्थास्तरावरील पडताळणी पूर्ण करण्यासाठी १५ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जातील माहिती व आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करून अर्ज सादर करावा. शैक्षणिक संस्थांनीही त्रुटी असलेल्या अर्जांची तसेच संस्थास्तरावरील अर्जांची पडताळणी विहित मुदतीत पूर्ण करावी. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी या शिष्यवृत्ती योजनांची माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी आणि अर्ज प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांनी आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक संचालक रविकिरण मलकुनाईक आणि मयुरी कदम यांनी केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: