नंदुरबार जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपर्यंत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ उत्साहात साजरा होणार
(नंदुरबार) आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सिकलसेल रुग्णांना उपचार, दिव्यांग प्रमाणपत्र व शासकीय योजनांचा लाभ; दुर्गम भागात आधार अद्ययावतीकरण मोहीम
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासोबतच समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सक्षमीकरण करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरात जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने आरोग्य, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ अशा विविध विषयांवर विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सिकलसेल रुग्णांसाठी विशेष सुविधा
जिल्ह्यात सिकलसेल तपासणीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित तपासणी पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. निदान झालेल्या रुग्णांना उपचार, औषधे आणि आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पात्र रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येतील.
सिकलसेल रुग्णांसाठी समुपदेशन कक्ष व स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रक्त संक्रमण कार्ड, आवश्यक कागदपत्रे आणि दिव्यांग लाभांबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. गरजू रुग्णांना औषधे व इतर मदत मिळवून देण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दुर्गम भागातील नागरिकांसाठी आधार अद्ययावतीकरण मोहीम
जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना जन्मदाखल्याअभावी आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी UIDAI च्या सहकार्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. गावपातळीवर शिबिरे घेऊन नागरिकांना आधार अद्ययावतीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. नियमानुसार जन्मतारखेच्या पुराव्याऐवजी जन्मवर्ष नमूद करून स्वघोषणापत्राच्या आधारे नोंदणीची उपलब्ध सुविधा वापरण्याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत. हा उपक्रम पुढील तीन महिने राबविण्याचे नियोजन आहे.
सप्ताहातील कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन
११ व १२ नोव्हेंबर – जनजागृती व प्रसिद्धी :जिल्हा व तालुकास्तरावर पत्रकार परिषदा घेऊन सप्ताहातील विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
१३ नोव्हेंबर – कल्याणकारी योजनांचा लाभ वितरण व जनजागृती : शहादा येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होईल. केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट) योजनेंतर्गत सन २०२६-२७ साठी २ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन व अर्ज सादर करण्यासाठी विशेष कक्ष आणि स्टॉल उभारण्यात येतील. तळोदा, अक्कलकुवा व धडगाव येथेही योजनांची माहिती देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात येतील.
१४ नोव्हेंबर – स्मारक स्वच्छता, दीपोत्सव व आदिवासी संस्कृती दर्शन :आदिवासी महापुरुषांच्या स्मारकांची व पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता करण्यात येईल. स्मारकस्थळी दीपोत्सव आयोजित करून आदिवासी देव-देवता, पारंपरिक पूजा पद्धती, लोककला व सांस्कृतिक परंपरांबाबत जनजागृती करण्यात येईल.
१५ नोव्हेंबर – भगवान बिरसा मुंडा जयंती व मुख्य शासकीय कार्यक्रम :जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येईल.
न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपये अर्थसाहाय्य वितरित करण्यात येईल. राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ मधील एका पात्र महिला बचत गटास ७ लाख ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. याशिवाय पात्र वैयक्तिक लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरित केले जातील.
आदिवासी लोककला, संस्कृती व परंपरांचे जतन करणाऱ्या कलाकारांचा गौरव व पुरस्कार वितरण, आदिवासी वैदू-भगत यांना प्रमाणपत्र व पारितोषिके, वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा व ८-अ उताऱ्यांचे वितरण तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि मशरूम उत्पादकांच्या माध्यमातून विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल उभारण्यात येतील. आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६७६ आदिवासी सेवा केंद्रांवर आदि स्वयंसेवकांच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात येईल.
१६ नोव्हेंबर – नागरी सेवा व शासकीय कागदपत्रे शिबिर :नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांत नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विशेष सेवा शिबिरे आयोजित करण्यात येतील. आधार कार्ड दुरुस्ती, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व इतर शासकीय कागदपत्रांसाठी सेतू सुविधा केंद्रांमार्फत सेवा उपलब्ध करून दिली जाईल. कृषी विभागामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना शेतकरी नोंदणी, पीकविमा व ऑनलाइन कृषी सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
१७ नोव्हेंबर – आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर :जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे घेण्यात येतील. रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल आजार, माता व बाल आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयातून हे उपक्रम राबविण्यात येतील. अंगणवाडी केंद्रांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी आरोग्य व पोषणविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातूनही शैक्षणिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
१८ नोव्हेंबर – सक्षमीकरण व सप्ताहाचा समारोप : ११ ते १७ नोव्हेंबरदरम्यान विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात येईल. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार व तळोदा यांच्या माध्यमातून संबंधित विभागांचे अहवाल संकलित करून एकत्रित अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांना बळकटी
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी नंदुरबार प्रकल्पांतर्गत सात व तळोदा प्रकल्पांतर्गत दोन अशा एकूण नऊ आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यात आली आहे.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रकल्प कार्यालयात बाह्यस्रोताद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून परिचारिकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच ‘प्रकाशवाटा’ उपक्रमांतर्गत गरजू व होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी NEET प्रवेश परीक्षेच्या तयारीकरिता विशेष अभ्यासवर्ग सुरू करण्यात आले आहेत.
६७६ गावांमध्ये जनसहभागाचे आवाहन
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या आयोजनासाठी सहाही तालुक्यांमध्ये तालुका समन्वय अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. नंदुरबार प्रकल्पातील ३५३ आणि तळोदा प्रकल्पातील ३२३ अशा एकूण ६७६ आदिवासी सेवा केंद्रांच्या गावांमध्ये आदि स्वयंसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, आरोग्य व शैक्षणिक सुविधांबाबत जनजागृती करणे, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
या सप्ताहात नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
Follow Us:

