राज्यात १ नोव्हेंबरपासून लिफ्टसाठी नवी सुरक्षा नियमावली लागू; १२ वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय प्रवेश बंद
(नंदुरबार) लिफ्टमधील अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने १ नोव्हेंबर २०२६ पासून नवी सुरक्षा नियमावली लागू केली असून, यानुसार १२ वर्षांखालील मुलांना पालकांच्या किंवा प्रौढ व्यक्तीच्या सोबतीशिवाय लिफ्ट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
- नव्या सुरक्षा उपाययोजना: महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने व सरकते मार्ग अधिनियम २०१७ अंतर्गत जारी केलेल्या या नियमांनुसार, जुन्या लिफ्टमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित बचाव यंत्रणा (Automatic Rescue Device) आणि अतिरिक्त वजनापासून संरक्षण करणारी यंत्रणा बसवणे बंधनकारक केले आहे.
- देखभाल आणि कडक कारवाई: इमारत मालक आणि गृहनिर्माण संस्थांवर लिफ्टच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे. दर महिन्याला मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून लिफ्टची देखभाल करून त्याची नोंद लॉगबुकमध्ये ठेवणे आणि वर्षातून किमान एकदा सुरक्षा चाचणी करून अहवाल विद्युत निरीक्षकांना सादर करणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास विद्युत निरीक्षकांना लिफ्ट सील करण्याचा किंवा परवाना रद्द करण्याचा अधिकार असेल.
- अपघाताची माहिती देणे बंधनकारक: लिफ्टमध्ये कोणताही अपघात घडल्यास २४ तासांच्या आत संबंधित विद्युत निरीक्षक आणि पोलिसांना कळवणे अनिवार्य केले असून, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लिफ्टधारकांनाही हे नियम लागू झाले आहेत.
Follow Us:

