पाचल दिवाळवाडी येथील राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन,13 ऑक्टोबरला होणारा शक्तितुरा टिपरी नृत्याचा जंगी सामना ठरणार खास आकर्षण
11 ते 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हा नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले असून 13 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 10 वा. राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीवाली शाहीर कु ऐश्वर्या गोतावडे (महालक्ष्मी टिपरी नृत्य मंडळ ओणी गोतावडेवाडी) विरुद्ध तुरेवाली शाहीर कु. तन्वी करंबेळे (सांबा कांडकरी टिपरी नृत्य कासारकोळवण (मावळत वाडी) ता. संगमेश्वर या दोन्ही तुल्यबळ शाहिरांत तुफान जुगलबंदी रंगणार आहे तसेच विविध भजन कार्यक्रम, वारकरी भजन, कीर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
गेल्या वर्षी मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये आरोग्य तपासणी सेवा शिबिर, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, हळदीकुंकू समारंभ तसेच तिरंगी महिला भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
यंदाच्या उत्सवातील विशेष आकर्षण म्हणून फॅन्सी ड्रेस स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच श्री सत्यनारायण महापूजा व विविध भजन मंडळांचे कार्यक्रमही होणार आहेत.
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी, महिला सहभाग, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांनी नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळ, पाचल दिवाळवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.

