राज्यात रोजगाराचा महाकुंभ! २५ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी; २९ सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये ४१८ हून अधिक रोजगार मेळावे घेण्यात येणार असून, त्यातून २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.
या रोजगार महाकुंभात १ हजार ५०० हून अधिक नामांकित कंपन्या व आस्थापना सहभागी होणार असून, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभव यांची उपलब्ध रिक्त पदांशी जुळवणी करण्यात येणार आहे. युवक-युवतींना रोजगाराच्या संधींसोबतच आवश्यक कौशल्ये, करिअरच्या विविध संधी आणि उद्योगांच्या मनुष्यबळविषयक गरजांची माहिती मिळणार आहे. उमेदवारांना मुलाखतीकरिता सक्षम करण्यासाठी संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास व सॉफ्ट स्किल्सचे प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘लाडक्या बहिणीं’साठी विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवारांना विविध कंपन्यांमधील उपलब्ध पदे, पात्रता, वेतनश्रेणी व भरती प्रक्रियेची थेट माहिती तसेच मुलाखतीची संधी मिळणार आहे. महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देत आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे.

