पेसा क्षेत्रातील पदभरती प्रक्रिया पारदर्शक, कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी – मंत्री डॉ. अशोक वुईके
मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी मंत्रालयातील समिती कक्षात घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार राजू तोडसाम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत रिक्त पदे, अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदभरती, उपलब्ध पदांची स्थिती, विविध नामावल्या, बिंदुनामावली, सेवा प्रवेश नियम आणि भरती प्रक्रियेतील अडचणींचा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिवांनी रिक्त पदांची अद्ययावत माहिती संकलित करून जिल्हानिहाय तपशील सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपलब्ध पदे, आरक्षणाची स्थिती आणि भरती प्रक्रियेतील प्रलंबित बाबींचा तातडीने आढावा घेऊन कार्यवाही करावी. शासनस्तरावरील अडचणी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने सोडवाव्यात, असेही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. पदभरतीतील ‘स्थानिक अनुसूचित जमाती’ या निकषामुळे काही ठिकाणी निर्माण झालेल्या अडचणींवरही बैठकीत चर्चा झाली.
संबंधित विभाग शासनाचे मार्गदर्शन, कायदेशीर व घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णय विचारात घेऊन स्पष्ट मार्गदर्शक सूचना निश्चित करणार आहेत.पेसा कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी आणि त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी तसेच शासकीय अथवा जिल्हा बदलीने पेसा क्षेत्रात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवास्थितीबाबत स्पष्टता आणण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.
बैठकीत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला. पवित्र पोर्टलवर प्राप्त अर्ज, पात्र उमेदवारांची उपलब्धता आणि जिल्हानिहाय शिक्षकांची आवश्यकता यांची माहिती घेऊन शिक्षकांची कमतरता असलेल्या जिल्ह्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.

