सावऱ्यादिगर गावाजवळ प्रवासी वाहन पलटी; २९ जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

मिळालेल्या माहितीनुसार, सावऱ्यादिगर गावाजवळ रस्त्यावर तीव्र उतार आहे. या उतारावर वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणांतच वाहन रस्त्यावर पलटी झाले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.
अपघातानंतर जखमींना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी सुमारे १० प्रवाशांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करून चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. आपल्या आप्तस्वकीयांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू होती. अनेकांच्या चेहऱ्यावर चिंता आणि काळजी स्पष्टपणे दिसून येत होती.
या अपघातातील जखमींमध्ये गिता चंद्रसिंग पावरा, रायदास पावरा, सोनही मोहन पावरा, दिनेश भोग्या भिल, जितान पावरा, स्तन जोरदार पावरा, विकला किला पावरा, किसन सान्या पावरा, दांड्या जान्या पावरा, जया टेकला पावरा, रुईला दमन्या पावरा, मगन पाडवी, सांगा पावरा, टेट्या पावरा, गिदार पावरा, जितेंद्र पावरा, कैला पावरा, वंदना पावरा, सुनिल पावरा, गुंड्या पावरा, रोहिदास पावरा आणि शांतिलाल पावरा यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धोकादायक उतार असलेल्या या मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

