‘सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशा

महाराष्ट्रात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला बचत गटांच्या माध्यमातून सुरुवात झाली. १९७० च्या दशकात अनौपचारिक स्वरूपात सुरू झालेली ही चळवळ पुढे संघटित झाली.
‘सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशा
savitri-umed-mall-rural-women-entrepreneurship

१९९२-९३ मध्ये नाबार्डने बचत गट-बँक जोडणी कार्यक्रम सुरू केला, तर १९९३ मध्ये रिझर्व्ह बँकेने बचत गटांना बँकांमध्ये बचत खाती उघडण्याची परवानगी दिली. १९९९ मध्ये केंद्र शासनाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेमुळे या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप मिळाले. पुढे २०११ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाच्या माध्यमातून या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर नवी दिशा मिळाली. बचतीपासून सुरू झालेला महिलांचा हा प्रवास आज उद्योग, उत्पादननिर्मिती आणि उद्योजकतेपर्यंत पोहोचला आहे.

मात्र, उत्पादन तयार करण्याचे कौशल्य आणि मेहनत असूनही त्याला योग्य बाजारपेठ मिळविण्याचे आव्हान अनेक महिला बचत गटांसमोर आहे. हीच अडचण दूर करण्यासाठी आता शासनाने महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘सावित्री-उमेद मॉल’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात पुण्यात होत असून, ग्रामीण महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळावी, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा मॉल उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात १९ कोटी ९९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीस ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित झाला आहे. सुमारे ७५ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उर्वरित निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकामाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

पुणे जिल्ह्यात सुमारे २७ हजार महिला स्वयंसहाय्यता समूह असून, त्यामध्ये तीन लाखांहून अधिक महिला सहभागी आहेत. या समूहांच्या माध्यमातून शेतीमाल, अन्नप्रक्रिया उत्पादने, मसाले, धान्य, मध, फळे, भाजीपाला, हस्तकला आणि विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जाते. अनेक महिलांनी घरगुती स्तरावर सुरू केलेल्या व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र, उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची विक्री कुठे करायची, ग्राहकांपर्यंत ते कसे पोहोचवायचे आणि योग्य बाजारभाव कसा मिळवायचा, हे प्रश्न कायम असतात. जत्रा, प्रदर्शने आणि विशेष विक्री उपक्रमांपुरतीच अनेकदा विक्रीची संधी मर्यादित राहते. त्यामुळे या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र असणे आवश्यक आहे. सावित्री-उमेद मॉलमुळे ही गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

सुमारे एक लाख १२ हजार चौरस फुटांच्या बांधकाम क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या मॉलमध्ये विक्री, कार्यालयीन कामकाज, प्रशिक्षण, निवास आणि सामाजिक उपक्रमांसाठी विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत. दोन पोटतळमजल्यांमध्ये २५० दुचाकी आणि ८६ चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर शॉपिंग मॉल आणि सात व्यावसायिक दुकाने, पहिल्या मजल्यावर शॉपिंग मॉल, बँक, कार्यालयीन जागा आणि साठवणूक कक्ष प्रस्तावित आहेत. दुसऱ्या मजल्यावर कार्यालये, कॅफेटेरिया, वसतिगृह आणि प्रशिक्षण सभागृह, तर तिसऱ्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, व्यासपीठ, स्वयंपाकघर आणि भोजन व्यवस्थेसाठी जागा असणार आहे. चौथ्या मजल्यावर कार्यालयीन कक्ष आणि खुली टेरेस प्रस्तावित आहे.

या सुविधांमुळे महिला बचत गटांना केवळ उत्पादनांची विक्री करण्यासाठीच नव्हे, तर व्यवसायविषयक प्रशिक्षण, मार्गदर्शन, बैठका आणि विविध उपक्रमांसाठीही एकाच ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उत्पादननिर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यापर्यंतची प्रक्रिया अधिक सक्षम करण्याची संधी या प्रकल्पातून निर्माण होईल.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सध्या ‘उमेद सावित्री’ ब्रेड, उमेद मार्ट, पुण्यश्री सुपर मार्केट, पुणे विमानतळावरील सावित्री विक्री केंद्र, सावित्री हाट, जत्रा, प्रदर्शने आणि खरेदीदार-विक्रेता मेळावे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून महिलांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावित्री-उमेद मॉलमुळे या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळणार आहे. उत्पादनांचे संकलन, प्रतवारी, पॅकेजिंग, साठवणूक, ब्रँडिंग आणि वितरण यासाठी एकात्मिक व्यवस्था विकसित करण्यास मदत होईल. ई-कॉमर्सच्या माध्यमातूनही विक्रीच्या नव्या संधी निर्माण करता येतील. त्यामुळे ग्रामीण भागात तयार होणारी उत्पादने केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचू शकतील.

महिला बचत गटांची चळवळ ही केवळ बचतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. या चळवळीने ग्रामीण महिलांना एकत्र आणले, आर्थिक व्यवहारांची ओळख करून दिली आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा आत्मविश्वास दिला. अनेक महिलांनी समूहाच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया, लघुउद्योग आणि विविध व्यवसायांत आपले स्थान निर्माण केले आहे. आता या व्यवसायांना अधिक गती देण्यासाठी उत्पादनाबरोबरच विक्री आणि विपणनाची व्यवस्था मजबूत होणे गरजेचे आहे. सावित्री-उमेद मॉल ही गरज पूर्ण करणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. उत्पादनांना योग्य बाजारमूल्य मिळणे, उत्पन्नात वाढ होणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणे आणि ग्रामीण महिलांचा आर्थिक सहभाग वाढणे, यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

या प्रकल्पाच्या उभारणीबाबत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी महिला बचत गटांना हक्काची आणि व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना नवी ओळख मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नवाढीसह आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद केले. उत्पादनांचे संकलन, प्रतवारी, पॅकेजिंग, साठवणूक, ब्रँडिंग आणि विपणन यासाठी हे केंद्र एकात्मिक व्यासपीठ ठरेल, असे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष विवेक बाळसे पाटील यांनीही या प्रकल्पामुळे ग्रामीण महिला उद्योजकांना मोठ्या बाजारपेठेशी जोडण्यास मदत होईल आणि जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्हा परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार बांधकाम सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

खरे तर सावित्री-उमेद मॉलचे महत्त्व केवळ एक मोठे व्यावसायिक केंद्र उभारण्यात नाही, तर पुणे जिल्ह्यातील हजारो महिला बचत गटांच्या कष्टाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात आहे. गावातील महिला बचत गटाने तयार केलेले उत्पादन आता पुण्यातील मोठ्या बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महिलांच्या कौशल्याला व्यवसायाची जोड, व्यवसायाला बाजारपेठ आणि बाजारपेठेतून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग या प्रकल्पातून खुला होईल.

महिलांच्या हाताला काम, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि कष्टाला योग्य मोबदला मिळवून देण्याच्या दिशेने सावित्री-उमेद मॉल हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरात हक्काची जागा मिळणे, ही महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला मिळणारी नवी ताकद आहे. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजकतेला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थाही अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: