के.आर. पब्लिक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

नंदुरबार:-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. आकर्षक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरण आणि विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शाळेचे वातावरण कृष्णमय झाले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते मटकी फोड व दहीहंडीचे आयोजन. सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या उत्साहपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात सहभाग घेतला. ब्लू हाऊस, ग्रीन हाऊस, रेड हाऊस आणि यलो हाऊस या गटांमध्ये दहीहंडीचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला शिक्षकांनीही उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी भाषणातून सहभाग, संघभावना, शिस्त आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, संचालिका सौ.केतकी वाणी, प्राचार्या डॉ.छाया शर्मा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दहीहंडीच्या उत्साहामुळे जन्माष्टमी सोहळ्याला विशेष रंगत आली. सांस्कृतिक विभागाचे विशेष सहकार्य लाभले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250