विज्ञापित

सोलापूरच्या मानाच्या आजोबा गणपतीला विशेष टपाल लिफाफ्याचा सन्मान; चंद्रकांत पाटीलांकडून ऐतिहासिक परंपरेचे कौतुक

सोलापूर : सोलापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मानाच्या आजोबा गणपतीच्या परंपरेला विशेष टपाल लिफाफ्याच्या माध्यमातून नवा सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६’ अंतर्गत या विशेष टपाल लिफाफ्याचे अनावरण करण्यात आले.
सोलापूरच्या मानाच्या आजोबा गणपतीला विशेष टपाल लिफाफ्याचा सन्मान; चंद्रकांत पाटीलांकडून ऐतिहासिक परंपरेचे कौतुक
solapur-ajooba-ganpati-special-postal-cover-honour-chandrakant-patil

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आजोबा गणपती उत्सवाला १८८५ पासूनची परंपरा असल्याचे उपलब्ध संदर्भांमध्ये नमूद केले जाते.

विज्ञापित

मंत्री पाटील यांनी टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक हेमंत खडकीकर यांचे विशेष आभार मानले. विशेष टपाल लिफाफ्याच्या माध्यमातून आजोबा गणपतीची ऐतिहासिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

धार्मिक उत्सवासोबत समाजप्रबोधनालाही महत्त्व

सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जतनाचे प्रभावी माध्यम ठरावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. विसर्जन मिरवणुकीनंतर गणेशमूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करून वर्षभर भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची आजोबा गणपतीची परंपरा उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवातील धार्मिक पावित्र्य आणि परंपरा जपण्याचे आवाहन करताना मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाशयोजना आदींचा वापर करताना नियमांचे पालन करावे, तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जनाच्या वेळेचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जातिभेद विसरून एकत्र येण्याची परंपरा

श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आजोबा गणपतीला मिळालेला सन्मान हा सोलापूरकरांसाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले. आजोबा गणपतीच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांची असून, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध समाजघटक जातिभेद विसरून एकत्र येतात, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक पावित्र्य जपत काढली जाते. ही परंपरा पुढेही जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास एपीएमजी, पुणे रीजनचे अविनाश पाखरे, सोलापूर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर हेमंत खडकीकर, माजी राज्यमंत्री तथा ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख, नगरसेवक अमोल शिंदे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, गणेशभक्त आणि नागरिक उपस्थित होते.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: