ग्रामपंचायत खरवतेच्या जलसंधारणाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राजापूर तालुक्यात भविष्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, सध्या वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे, भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी आणि दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी गावाची पाणी सुरक्षितता बळकट व्हावी, या उद्देशाने आपण सर्वांनी एकत्र येत वनराई बंधारे बांधण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.
या लोकसहभागाच्या उपक्रमात सहभागी झालेले सर्व ग्रामस्थ, पोलिस पाटील, बचत गटातील सर्व महिला, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शालेय विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीची संपूर्ण टीम या सर्वांचे विशेष आभार आणि कौतुक केले आहे
कोंडवाडी व मधली वाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने वनराई बंधारे बांधण्याची जी तयारी दर्शवली आहे, ती खरोखरच प्रेरणादायी आहे. आजचे हे श्रमदान म्हणजे उद्याच्या पाणी सुरक्षिततेसाठी केलेली मौल्यवान गुंतवणूक आहे तुमच्या या पुढाकारातून, सहभागातून जलसंधारणाची ही चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

