कुपोषणमुक्त नंदुरबारच्या दिशेने प्रभावी पाऊल; अंगणवाडी सक्षमीकरणासह बालकांच्या पोषणासाठी व्यापक उपक्रम!

(नंदुरबार) लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व आणि शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून बालकांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प!नंदुरबार जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देत कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ‍जिल्हयात विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
कुपोषणमुक्त नंदुरबारच्या दिशेने प्रभावी पाऊल; अंगणवाडी सक्षमीकरणासह बालकांच्या पोषणासाठी व्यापक उपक्रम!
Strong push for malnutrition-free Nandurbar through Anganwadi strengthening and child nutrition drive!
      जिल्ह्यातील कुपोषणाची वस्तुस्थिती जाणून घेणे, त्यामागील कारणांचा शोध घेणे आणि त्यानुसार परिणामकारक उपाययोजना निश्चित करणे या उद्देशाने आरोग्य विभाग तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे प्रत्येक बालकाच्या पोषणविषयक स्थितीचे मूल्यांकन करून कुपोषण निर्मूलनासाठी अधिक प्रभावी आणि परिणामकारक नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मा.ना. आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.
       जिल्ह्यातील बालकांना पोषणयुक्त आहार, आरोग्य सुविधा, गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षण आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर दिला जात आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
अंगणवाडी सक्षमीकरणासाठी पायाभूत सुविधांवर भर.
       नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना अधिक सक्षम आणि बालस्नेही बनविण्याच्या दृष्टीने तळोदा तालुक्यातील मोरवड, उमरी तसेच मोड येथील प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारतींचे लोकार्पण यावेळी मा.ना. आदिती तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास विभाग यांचे हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरणात शिक्षण व पोषण सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अंगणवाडी ही केवळ बालकांना आहार देण्याची जागा नसून बालकांच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाचा पाया घडविणारे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण साहित्य, खेळणी, स्वच्छतागृह आणि खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.
सहा हजार बालकांना दोन वेळचा पोषण आहार.
      बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी पोषण आहाराची उपलब्धता आणि गुणवत्ता महत्त्वाची असल्याने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. फीडिंग इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून सध्या दररोज सुमारे ५ हजार ६०० बालकांना दोन वेळचा आहार दिला जात आहे.
या उपक्रमाचा विस्तार करून माहे डिसेंबर महिन्यापासून दररोज २० ते २५ हजार बालकांना भोजन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून बालकांना नियमित आणि पोषणयुक्त आहार मिळण्यास मदत होणार असून कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळ मिळणार आहे.
सामाजिक उत्तरदायित्वातून विकासाला गती.
        जिल्ह्यातील बालकांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांसोबतच सामाजिक उत्तरदायित्व निधीचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. फीडिंग इंडिया, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्या समन्वयातून अंगणवाडी केंद्रांचे बळकटीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नावीन्यपूर्ण उपक्रम, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. विविध यंत्रणांमधील समन्वयामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्यास मदत होत आहे.
कुपोषण निर्मूलनासाठी सर्वंकष दृष्टिकोन
       कुपोषण निर्मूलन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामविकास यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्य तपासण्या, नियमित वजन व उंची मोजणी, पोषण आहाराची उपलब्धता, माता-बाल आरोग्यविषयक जनजागृती आणि अंगणवाडी सेवांचे सक्षमीकरण या बाबींवर एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील कुपोषणाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी करण्यात येणारे संयुक्त सर्वेक्षण या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे गरजेनुसार उपाययोजना निश्चित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रयत्न
       या उपक्रमांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील बालकांना उत्तम पोषण, आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंगणवाडी केंद्रांचे आधुनिकीकरण, पोषण आहार व्यवस्थेचा विस्तार, सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि विभागीय समन्वय या बाबी कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
बालकांचे आरोग्य सुदृढ असेल, तरच समाज आणि जिल्ह्याचे भविष्य सक्षम होईल. त्यामुळे प्रत्येक बालकाला कुपोषणमुक्त बालपण आणि विकासाच्या समान संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाचे हे प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण आणि अनुकरणीय ठरत आहेत.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: