तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा डाब येथे इयत्ता पहिलीपासून संगणक शिक्षण,आदिवासी विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाकडे उत्साहाने प्रवास

आजच्या डिजिटल युगात संगणक आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या संधींपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शाळेच्या वतीने संगणक शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आश्रमशाळेत इयत्ता पहिलीच्या लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान, तंत्रज्ञानाचा योग्य वापर तसेच डिजिटल कौशल्यांची ओळख करून दिली जात आहे.
संगणक शिक्षणाला विद्यार्थ्यांकडूनही अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सर्व मुले मोठ्या उत्साहाने संगणक शिकताना दिसत आहेत. पारंपरिक शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळत असल्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून त्यांची शिकण्याची उत्सुकता वाढीस लागली आहे. या उपक्रमात संगणक शिक्षक इंजि. राकेश पाडवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यावर विशेष भर दिला जात आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या या आश्रम शाळेतील आदिवासी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षण घेऊन थांबू नये, तर तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात पूर्णपणे सक्षम होऊन जगाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने उतरावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकासोबत संगणकाचे आधुनिक ज्ञान असावे आणि त्यांच्या डोळ्यांसमोर जागतिक स्पर्धेचे ध्येय असावे, या विचारातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न या आश्रमशाळेत केला जात आहे. दुर्गम भागातील मुलांची ही डिजिटल क्रांतीच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल खरोखरच कौतुकास्पद आहे.

