प्रकाशा जिल्हा परिषद कन्या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष, सीसीआरटी राणी लक्ष्मीबाई क्लबच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी

कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात आकर्षक पद्धतीने दहीहंडी बांधण्यात आली होती. कब बुलबुल व सीसीआरटी राणी लक्ष्मीबाई क्लबच्या विद्यार्थिनींनी दहीहंडी सजावटीसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा व गोपिकांची मनमोहक वेशभूषा करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एलईडी स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांचे जीवनकार्य, त्यांचे विचार व समाजाला दिलेला संदेश याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. त्यामुळे उत्सवाला सांस्कृतिकतेसोबतच शैक्षणिक स्वरूप प्राप्त झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी कृष्णगीतांवर आकर्षक नृत्य, गरबा तसेच कृष्णभजन सादर केले. ‘गोविंदा आला रे. नटखट बालगोपाल, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो’ या गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत वातावरणात चैतन्य निर्माण केले. कृष्ण भजनांच्या जयघोषाने संपूर्ण शाळेचे प्रांगण भक्तिमय झाले.
उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरलेल्या दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात लहान बालगोपालांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक जल्लोषात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडत ‘गोविंदा आला रे!’च्या जयघोषात श्रीकृष्ण जन्माचा आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, सण- उत्सव आणि भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील मूल्यांची ओळख करून देण्यात आली. उत्सवातून संस्कार आणि संस्कारातून शिक्षण या शाळेच्या उपक्रमशील दृष्टिकोनाची प्रचिती यानिमित्ताने आली.
कार्यक्रमास मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षक गोपाल गावित, शिक्षिका नूतन पाटील, प्रियंका पाटील, माता-पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि शिक्षकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

