टाटा कॅपिटलच्या ‘सीएसआर’ उपक्रमांमुळे साडेपाच लाख नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:-महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासनासोबत उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, जलसंधारण, अक्षय ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात येणारे उपक्रम राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत आहेत.
टाटा कॅपिटलच्या ‘सीएसआर’ उपक्रमांमुळे साडेपाच लाख नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
tata-capital-csr-initiatives-bring-positive-change-to-5-lakh-citizens-cm-devendra-fadnavis

        टाटा कॅपिटलच्या विविध उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, आदिवासी, महिला आणि युवकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, टाटा कॅपिटलच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे. कंपनीच्या देशभरातील एकूण सामाजिक उत्तरदायित्व खर्चापैकी सुमारे 30 टक्के खर्च महाराष्ट्रात करण्यात आला असून, देशभरात 37 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत विविध सुविधा पोहोचविण्यात आल्या आहेत.
आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी ‘पंख शिष्यवृत्ती’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 6 हजार 400 हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. पालघरमधील आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत शासकीय शाळांमधील 85 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार आणि जबाबदारीने कर्ज घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि एसटीईएम विषयांमधील कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘प्रोअस्पायर’ उपक्रमांतर्गत राज्यातील 26 हजारांहून अधिक युवक, महिला, आदिवासी आणि दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, उद्योजकता आणि व्यावसायिक कौशल्यांवर भर देत रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’आरोग्यतारा’ उपक्रमांतर्गत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला आहे.

        मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टिदोष तपासणी, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियांसाठी नामांकित रुग्णालयांच्या सहकार्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच कर्करोग प्रतिबंध, जनजागृती, प्राथमिक तपासणी आणि विशेष उपचारांसंबंधी उपक्रमांचा लाभ 30 हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. यामध्ये स्तन व फुफ्फुसाच्या  कर्करोगाची तपासणी, गर्भाशयमुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती, वैद्यकीय उपकरणे आणि उपचारांसाठी सहाय्याचा समावेश आहे. ‘जलआधार’ उपक्रमांतर्गत पालघर, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांतील 60 हून अधिक गावांमधील 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक नागरिकांसाठी जलसुरक्षा निर्माण करण्यास हातभार लागला आहे. 600 हून अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, दरवर्षी 8 हजार 500 लाख लिटरपेक्षा अधिक पाणीसाठवण क्षमता निर्माण झाल्याचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यातील दहा गावांमध्ये 10 हजार हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून, जलसंधारणासह शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
‘द ग्रीन स्विच’ उपक्रमांतर्गत पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील 19  दुर्गम वस्त्यांमधील 580 हून अधिक वीजवंचित घरांपर्यंत सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा पोहोचविण्यात आला आहे. घरगुती वापरासह पथदिवे आणि सार्वजनिक इमारतींसाठी वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक ग्राम वीज समित्यांच्या सहभागातून प्रकल्पांच्या देखभालीची व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. ‘वनारोपण फॉर न्यूट्रॅलिटी’ उपक्रमांतर्गत ठाण्यातील पारसिक टेकडी परिसरात मियावाकी पद्धतीने 40 हून अधिक प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या 30 हजारांपेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे जैवविविधता संवर्धन आणि शहरी हरित क्षेत्रवाढीला चालना मिळत आहे. शिक्षणातून सक्षम विद्यार्थी, कौशल्य विकासातून रोजगारक्षम युवक, आरोग्यसेवेतून सुदृढ समाज आणि जलसंधारणातून सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्था घडविण्यासाठी शासन, उद्योग क्षेत्र व स्थानिक समुदायांचा एकत्रित सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टाटा कॅपिटलचे हे उपक्रम सर्वसमावेशक आणि शाश्वत महाराष्ट्राच्या निर्मितीला बळ देणारे ठरत आहेत.

 

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: